मुख्य सामग्रीवर वगळा

पत्नीचा खून करून पतीने नेमकं काय केलय..

. बीड : पत्नीचा गळा आवळून खून करीत एका तरुणाने स्वत:लाही संपविले. ही खळबळजनक घटना शहराजवळील नाळवंडी नाका परिसरात घडली. मयत दाम्पत्य मध्यप्रदेशातील रहिवासी असून, ते मोलमजुरीसाठी येथे स्थायिक झाले होते. अनिता काळू भुरिया (२२)व काळू नरसिंग भुरिया (२५) (रा. जगन्ना, मध्यप्रदेश) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे.
नाळवंडी नाका परिसरात विजय लाटे यांचे खडी क्रशर आहे. याठिकाणी मध्यप्रदेशातील दहा कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून याकिठाणी मजुरी करतात. क्रशरलगत त्यांच्यासाठी घरे बांधलेली असून तेथेच हे दाम्पत्य राहत होते. अनिताचा भाऊ व इतर नातेवाईकही तेथेच दुसर्‍या खोलीत राहत होते. रविवारी दिवसभर काम करुन रात्री ते घरी आले. यावेळी त्यांच्यात घरगुती कारणावरुन कुरबुर झाला. त्यानंतर दोघांनीही जेवण केले. मात्र, त्यानंतर कुरबुरीचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. मध्यरात्री साडेबारा वाजता पत्नीचा भरझोपेतच पतीने दोरीने गळा आवळला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर तो घराबाहेर पडला अन् घराजवळील एका लिंबाच्या झाडाला त्याने साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत भुरिया दाम्पत्याच्या घराचा दरवाजा बंद होता. क्रशरवरील इतर मजुरांनी दरवाजा ठोठावला; परंतु आतून प्रतिसाद नव्हता. त्यानंतर काही मजुरांना काळूचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. मजुरांनी घराचा दरवाजा उचकवून पाहिले तर पत्नीही मृतावस्थेत आढळली. त्यानंतर मजुरांनी लाटे यांना कळविले असता त्यांनी पोलिसांशी संपर्क केला.भांडणाच्या कारणावरुनच पत्नीला संपवून पतीने स्वत: आत्महत्या केल्याची फिर्याद मयत अनिताचा भाऊ राकेश जानसिंग खराडी यांनी दिली. ■ बीड शहराच्या पूर्वेला चार सहा किमी अंतरावर नाळवंडी रस्त्यावर हे खडी क्रशर आहे. घटना घडल्यावर क्रेशरमालकाने बीड ग्रामीण पोलिसांना कळविले; परंतु त्यांनी पेठ बीड पोलिसांची हद्द असल्याचे सांगून घटनास्थळी जाण्यास विलंब केला. पेठ बीडपोलीस तेथे पोहचले असता ही हद्द ग्रामीण ठाण्याचीच असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनीही मृतदेहाला हात लावला नाही.
आठ महिन्यांपूर्वीच विवाह
■ मयत काळू याने अनितासोबत आठ महिन्यांपूर्वीच विवाह केला होता. ते दोघे विवाहानंतर रोजगाराच्या शोधात मध्यप्रदेशातून बीडला आले होते. त्यांचे काही नातेवाईक आधीच बीडमध्ये खडी-क्रशरवर काम करीत होते. मात्र, विवाहानंतर क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात खटके उडत. यातून काळू याने टोकाचे पाऊल उचलले. पत्नीच्या खुनाचा पश्‍चाताप झाल्याने त्याने स्वत:लाही संपविले, अशी माहिती फौजदार एन. जी. पठाण यांनी दिली.

टिप्पण्या