Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

डेरा सच्चा सौदा आणि भगवानगड...अवश्य वाचा... ABP Mazha अँकर विलास बडे यांचा सणसणीत लेख


बाबा राम रहीमबद्दल देशभर बरीच चर्चा सुरू आहे. या सगळ्या प्रकरणात एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. समाजातील पिचलेल्या लोकांच्या उत्थानासाठी "डेरा सच्चा सौदा" या पंथाची सुरुवात झाली. मानवतेच्या विचारावर उभारलेल्या या पंथाची पाच- सहा दशकात प्रचंड भरभराट झाली. पण डेरा प्रमुखांच्या गादीवर बसलेल्या अविचारी गुरमीतमुळे एका समाजिक चळवळीचीच जणू हत्या केलीय.

गुरमीतमुळे एक क्रांतीकारी डेरा चळवळ जशी अस्ताला जातीय तसंच काहीसं आपल्या महाराष्ट्रातल्या पंथांबद्दलही होतंय. विशेषत: भगवानगडाबद्दल. मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय. यात कुठलाही व्यक्तीद्वेष किंवा अभिनिवेश नाहीय. हे वास्तव आहे.

महाराष्ट्रातल्या अनेकांना भगवानगडाच्या समाजिक जडणघडणीबद्दल फारसं माहीत नाहीय. पण भगवानगड ही सुद्धा एक सामाजिक चळवळ होती. डोंगर कपाऱ्यात, माळरानावर, डोगंराच्या पायथ्याला राहून आपलं अस्तित्व शोधणाऱ्या माणसांची ही चऴवळ. याचं नेतृत्व भगवानबाबांनी केलं. काळाची पावलं ओळखत त्यांनी आध्यात्म आणि  शिक्षणाची सांगड घातली. पुढच्या पिढ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळवून दिल्या. त्या अर्थी ते कर्मवीर होते. त्यातून अनेक अधिकारी घडले हे वास्तव आहे.

 निरक्षर, गरीब, मागास समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले. किर्तनातून समाज प्रबोधन केलं. त्यांनी अनेक शिष्य घडवले. शिष्यांनी प्रबोधनाचं काम पुढे नेलं. म्हणून ती भटकणारी माणसं मुख्य प्रवाहात आली. ते चमत्कारी वगैरे बाबा नव्हते त्यांचं कामच दैवी होतं. काळाच्या पुढे जावून विचार करणारं, समाजाला दिशा देणारं आणि काळाच्या ओघात अजरामर राहाणारं होतं. म्हणून त्यांना देवत्व प्राप्त झालं. पुढे भिमसेन महाराज गादीवर आले. पण भगवान बाबांची उंची त्यांना गाठता आली नाही. ना गडाचा विकास झाला ना विचार पुढे गेला. त्यांच्या निधनानंतर नामदेव शास्ञी गादीवर आले. त्यांनी राजकीय वरदहस्ताचा खुबीने वापर केला. गडाचा, स्वत:चा भौतिक विकास करून घेतला, गडाच्या भौतिक विकासाचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. मुंडे साहेबांच्या नेतृत्वामुळे गडाची महती राज्यभरात पोहोचली. त्यातून लाखो लोक गडाशी जोडले गेले. पण नामदेव शास्ञी भगवानबाबांच्या विचारांच्या आणि कर्तृत्वाच्या आसपासही कधी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे बाबांची सामाजिक चळवळ खंडीत झाली. दूर्दैवाने आता ती फक्त किर्तन आणि आध्यात्मिक परंपरेपुरती मर्यादीत राहिलीय.

गेल्या 5 दशकात भगवानगड हा जातीपातीच्या पलिकडे जाऊन लाखो माणसांची अस्मिता बनला. कारण त्या माणसांना समाजव्यवस्थेत तोपर्यंत कुठलंही स्थान नव्हतं. ओळख नव्हती. प्रत्येक समाजाला आपली ओळख हवी असते. भगवानगडाने लाखो लोकांना ती दिली. काळानुसार प्रश्न बदलले. संदर्भ बदलले. पण ही चळवळ पुढे गेली नाही. उलट बाबांच्या उदात्त विचारापासून ती दूर गेली. एक किस्सा सांगतो. तो ऐकल्यावर तुम्हाला यातलं मर्म जाणवेल.

साधारण दोन वर्षांपूर्वी भगवानगडावर मुक्कामाला गेलो होतो. त्या राञी महंतांशी बऱ्याच गप्पा झाल्या. गडाकडून सुशिक्षित तरूणांची काय अपेक्षा आहे, याबद्दल बोललो. त्यात समाजातील हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी, अनेक अंधश्रद्धा, पोटातच मारल्या जाणाऱ्या पोरी, ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षणाचे गंभीर प्रश्नं, गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांतील लोकांचं पोटासाठी मुंबई- पुण्याच्या आश्रयाला जाणं, हालाकीच्या परिस्थितीत पोरांचं स्पर्धा परिक्षांसाठी धडपडणं या सगळ्या प्रश्नांबद्दल गडानं भूमिका घ्यावी, मदत करावी. महंतांनी बाबांच्या गादीवरून या प्रश्नांबद्दल बोलावं ही विनंती केली. कारण गडाच्या अनुयायांसाठी गादीचा शब्द प्रमाण असतो. बाबांचं उभं आयुष्य  इथल्या माणसांना दारिद्य, निरक्षरता आणि अंधश्रद्धेच्या दरीतून बाहेर काढण्यात गेलं. त्यांच्या विचारांवर निस्सिम श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाला बाबांच्या गादीकडून जी अपेक्षा होती, तीच बोलून दाखवली. त्यांनी सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि एका वाक्यात सगळे सामाजिक प्रश्न सोडवले.
ते म्हणाले " ही असली कामं गादीची, गडाची नाहीत. ही काही सामाजिक संस्था नाही. आमचं काम आध्यात्म आहे, गादी चालवणं आहे, ते करतोय."

त्या उत्तराने असंख्य प्रश्न निर्माण झाले. माझ्यापरीने त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. वाटलं गडाची गादी बाबांच्या विचारांपासून दूर गेलीय. सकाळी उठलो. महंतांच्या गादीचं दर्शन न घेता बाबांच्या समाधीचं दर्शन घेवून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली!