एबीपीला माझा निरोप!!
"नमस्कार, मी विलास बडे" म्हणत एबीपीमुळे घराघरात पोहोचलो. एबीपी माझाचा निरोप घेताना काहीसं अवघडल्यासारखं झालं. खरंतर कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये तीन-साडेतीन वर्षं काम केल्यानंतर आपलं एक नातं तयार होतं. माझंही झालं. अगदी माझ्या इपी, टायपासून ते ऑफिसातल्या असंख्य माणसांपर्यंत. छोट्या छोट्या गोष्टीत गुंतलो. या गुंत्यातून बाहेर पडताना थोडा ञास होणारच. पण नवं स्विकारण्यासाठी जुनं सोडावं लागतं.
माझात आल्यावर रिपोर्टरचा एँकर झालो. एँकर म्हणून अनेक गोष्टी करण्याची संधी मिळाली. या तीन साडेतीन वर्षात एबीपीनं आत्मविश्वास दिला. नवी ओळख दिली. पण रिपोर्टिंगची खाज कायम होती. स्वाती पिटलेच्या बातमीनंतर मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत पास मिळाला. ते समाधान खूप वेगळं होतं. एबीपी "माझा" वाटण्याचं महत्वाचं कारण म्हणजे इथं भेटलेली अनेक जिवाभावाची माणसं. ती माणसं वाचत गेलो. त्यांच्याकडून शिकत गेलो.
संपादक राजीव खांडेकर सरांचा संयम, समोरच्याचं ऐकून घेणं, त्याचं समाधान करणं, अपराध पोटात घेणं, पाय जमिनीवर ठेवून जगणं हे शिकण्यासारखं आहे. सरांच्या केबिनचे आणि मनाचे दरवाजे नविन कल्पनांसाठी कायम खुले असतात हे त्यांचं वैशिष्ट्यं.
हल्ली पञकारितेतही अनेक माणसं बुरख्यात वावरतात. आतून वेगळे आणि बाहेर वेगळे. पण या गर्दीत उमेश कुमावत सरांनी आपलं वेगळं अस्तित्व जपलंय. क्राईम रिपोर्टिंगपासून ते दुष्काळाच्या संवेदनशील पञकारितेपर्यंत त्यांच्यातला साधेपणा आणि सच्चेपणा आम्हा नवख्यांना खूप काही शिकवणारा आहे.
मेघराज पाटील सर, संदीप रामदासी सर, विजय साळवी सर, नितिन भालेराव सर, शेफाली मॅडम ही कुणालाही कनिष्ठ न समजणारी वरीष्ठ मंडळी. यांचं वेगवेगळ्या विषयांवर सगळ्यांनाच कायम मार्गदर्शन मिळतं. चुकलं तर चूक दाखवून देणारे आणि चांगलं केलं तर पाठीवर थाप देणारे हे 'खरेखुरे वरीष्ठ'.
मेघराज सर- टीव्ही पञकारीतेतला बाप माणूस. बार्शीशी घट्ट नाळ जोडलेला. पण बार्शी ते बार्सिलोनाच्या सगळ्या विषयांची इत्यंभूत माहितीचा एन्सायक्लोपिडिया. विधानसभेची वारी करणाऱ्या मेघराज सरांना ऑफिसच्या राजकारणाचा 'र' ही जमत नाही.
संदीप सर - मोहोब्बते मूवीतले शाहरूख खान. शेतीवर निस्सीम प्रेम करणारे आणि आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांना शेतीवर प्रेम करायला शिकवणारे शेती पुरूष. त्यांनी केवळ संकटांपुढे गुढघे टेकून गळा काढणारी शेती पञकारिता केली नाही. शेती पञकारितेला पॉझिटिव्हिटीचं सेंद्रिय खतपाणी घातलं.
विजय साळवी सर - खच्चून दारूगोळा भरलेली तोफ. त्यांच्यातली उर्जा पाहिली की कधीकधी आपल्यालाच कमीपणा वाटतो. विजय सरांचा स्क्रिनपासून प्रत्यक्ष वागण्यातला प्रचंड उत्साह, भालेराव सरांचा आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीतला रॉयलनेस आणि शेफाली मॅडमच्या क्रिएटीव्हीनं मला नेहमीच प्रेरीत केलं.
द मिलिंद भागवत..! आपला आपल्यालाच राग यावा इतका हा साधा आणि दिलदार माणूस. यांच्यासारखा बॉस मिळायला भाग्य लागतं. एँकरिंग यांच्याकडे पाहून शिकलो. सर, तुम्ही आजही माझे बॉस आहात, कायम राहाल. मिञ तर आहोतच.
रेश्मा, सचिन आणि मी जिवाभावाचे मिञ. बेस्ट फ्रेन्ड वगैरे. आमचं बॉन्डिग कलिगच्या खूप पलिकडचं आहे. ही दोघं म्हणजे माझं सुख दु:ख हलकं करण्याचं हक्काचं ठिकाण. या दोघांनी माझ्यासाठी इतकं काही केलंय की काही ओळीत सांगताच येणार नाही. सचिन इतरवेळी जितका मस्तीखोर तितकाच कामाच्या बाबतीत चोख! सच्चा टीम लिडर. हसून वेदना लपवणारा. पण मी कुठेही असलो तरी तुमच्या दोघांच्या (स्वतंञ) लग्नासाठी नक्की येणार आहे. तुम्हाला खूप मिस करेन.
या दोघांबरोबरच अनेक जवळच्या मिञ मैञिणी भेटल्या.
अश्विन बापट - ऑफिसमधला सगळ्यात हरहुन्नरी माणूस. कुठलीही जबाबदारी द्या यशस्वीपणे पेलायला तयार. माणूस म्हणून प्रचंड मनमिळावू. टीमसाठी झटणारा, मनात भरलेल्या प्रत्येकावर जीव लावणारा माणूस.
रेश्मा- गेल्या चार वर्षांत तिनं स्वत:ला एँकर म्हणून सिद्ध केलंय. आजही गावातल्या शेतीत काम करण्यापासून शेती सन्मान होस्ट करण्यापर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. तिचं व्यक्तिमत्व म्हणजे जणू झाशीची राणीच.
ज्ञानदा - स्वत:ला कॅमेऱ्यासमोर कसं प्रेझेंट करावं हे ज्ञानदाकडून शिकलो...
नम्रता वागळे- ऑनस्क्रीन असो की ऑफ स्क्रीन प्रचंड आत्मविश्वासानं वावरते. स्वत:च्या टॅलेंटवर तिनं स्वत:चं स्थान निर्माण केलंय. जगण्यातला बिनधास्तपणा ही तिची खासियत. माझ्याहातून चूकून तिचा एकदा कपाळमोक्ष झाला. रक्त वाहिलं. पण बिचारी शब्दाने काही बोलली नाही.
दीपक - अर्थात कवी मनाचा लाडका बबड्या. पाऊसओळीतून गोड बरसत राहातो.
अमोल - बंडखोर, कडवा उजवा आणि सगळ्यांचे हिशेब जागेवर चुकते करणारा मनमोकळा माणूस
बाळासाहेब - दिसायला साधा पण कळायला प्रचंड अवघड माणूस. पण रोमॅन्टिक शब्दप्रभू.
दीपाली - किबोर्डच्या मानगुटीवर बसून त्याला बदड बदड बदडून त्याच्याकडून काम करून घेणारी बिगटेक्स्ट बॉस म्हणजे दीपाली. वागायला सासू आणि कामात वाघीण.
अजय सोनावणे- मोठा छुपारूस्तुम. या माणसाला जेव्हा प्रेम झालं असेल तेव्हा याने स्वत:च्या मनालाही सांगितलं नसेल इतका छुपारूस्तुम. या माणसाचं क्विलिटी काम लोकांना दिसत नाही. पण प्रॉम्प्टरवरच्या लिंकरूनच कळायचं हा अजय आहे. पुरोगामी लिंक लिहावी तर ती अजयनंच.
नवनाथ - अस्सल मराठवाडी आवाज. पट्टीचा वक्ता. टोकदार, धारदार कट्टेकरी.
स्नेहा - सगळ्यांची लाडकी बॉस. स्नेहा जेवढी प्रेमळ तितकीच कठोर असं रसायन. तिच्यात नेतृत्वगूण आहेत. ती कुणाची उधारी मनात ठेवत नाही. तोंडावर हिशेब चुकते करते. त्यामुळे ती खरी आहे.
सोनाली - डेडिकेटिव्ह काम करायचं पण केलेलं काम अजिबात मिरवायचं नाही अशी व्यक्ती.
राखी - प्रचंड हौशी आणि उत्साही कलाकार. निष्ठेनं काम करणारी राखी आपला शो चांगला करण्यासाठी जे काही करते त्याचं खूप कौतूक वाटतं.
स्नेहल - सगळ्यांचं सगळं काम आर्काईव्ह करणारी, पण कुणाला कुणाचा "टीसी" न सांगणारी. खूप लाघवी स्वभावाची व्यक्ती.
कॅमेऱ्यामागची भन्नाट नजर असणारे आशिष काटकर आणि आशिष सुर्यवंशी माणूस म्हणूनही भन्नाट आहेत. ती कलात्मकता त्यांच्या जगण्यातूनही दिसते. कॅची लाईन सुचणारं नगरचं सुपीक डोकं अण्णा, मान मोडून काम करणारी पण कुणालाही न दाखवणारी श्रद्धा, कायम 'तिसरा' विचार करणारी शालीतली जोडी अनिश- गुरु. हजरजबाबी मनमोकळी कोमल. सडेतोड "शारदा" स्वारी स्वरदा, टोकदार आणि काळजाला भिडणाऱ्या शब्दातून भूमिका मांडणारी "दामिनी", आपल्या विचारांवर ठाम श्रद्धा असणारा आजच्या तरूणांमधला हळव्या मनाचा सुंदर लिहिता डावाहात म्हणजे नामदेव.. माझ्यावर जीव लावणारं माझातलं देखणं व्यक्तिमत्व विशाल.. स्वत:वर जोक करून घेत हसणारा पण प्रचंड सेंसिटिव्ह आदित्य.. विचारानं स्वयंसेवक पण "सहिष्णू", स्वच्छ मनाचा प्रसन्न.. कोणालाही पटकन आपलसं करणारा हळवा रोहीत ही माझात नव्यानं दाखल झालेली ब्रिगेड चॅनेलचं असेट आहेत. खूप ऊर्जेनं हे सगळेजण चॅनेलसाठी आपलं योगदान देताहेत.
बोअरिंग असं पॅनलिंग ज्यांच्या सहवासाने सुसह्य झालं अशा टेक्निकल टीमशी खूप जवळचं नातं होतं.
पीसीआर टीम - संजय सर स्विचिंगला असले की तुमचं अर्ध काम झालेलं असतं. कि बोर्डवरच्या असंख्य बटणांची गर्दी त्यांच्या बोटांना जणू शरण येते. रवी सरांसोबत शिफ्ट म्हणजे आठ तासही कमी वाटायचे. कामाबद्दल प्रचंड डेडिकेशन असणारा अस्सल कलाकार, सदाबहार माणूस. बाकी काही स्पेशल इफेक्ट्चे 'प्रयोग' करावेत तर रोहननेच. राजाभाई तर ऑलराऊंडरच. अगदी मांजरासारखा. कुठून कुठेही टाका कामासाठी चार पायावर तयारच.
महेशजींशी भांडताना कायम वाटायचं ते आहेत तोपर्यंत हिंदू धर्माला कसलाच धोका नाही. श्रवण आणि रवीने माझ्या कितीतरी शिंका, खोकला प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचू दिल्या नाहीत. दिलीपदादा, मामा, वाजपेयीजी, महेशजी, बबनदादा, राजेश, प्रशांत, हेमंतजींनी कायम विद्युतवेगानं आडव्या, उभ्या फ्रेम लावल्या. त्यांच्यामुळे मी नीट दिसायचो.
आम्हा एँकर्सचं आनंद, दु:ख, नैराश्य, कटकट हे सगळं बाहेर पडण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मेकअप रूम. योगेश दादा, धनंजय दादा, सचिनदादा, सुनिलदादा, गीताताई, मनिषा ताई, ज्योतीताई हे सगळे याचे साक्षिदार. या दादांनी कधीही तक्रार न करता अवघ्या काही मिनिटात तयार केलं. चेहऱ्यावर बेससोबत जीव लावला. यांच्यामुळेच स्क्रीनवर उजळू शकलो. मेकअपरूममध्ये पसरलेला आमचा पसारा कसलीही कटकट न करता आवरणाऱ्या अलका ताईं आणि त्याचं सिरियल प्रेम खास लक्षात राहील. खरंच या सगळ्यांकडून कसं जगावं हे शिकलो तर काहीजणांकडून कसं जगू नये हेही शिकलो.
गेल्या काही दिवसात आयुष्यं साचल्यासारखं वाटत होतं. ते पुन्हा प्रवाही करण्यासाठी सगळे बांध तोडून पुढच्या प्रवासाला निघालोय. ही सगळी माणसं आणि यांच्यासोबतच्या असंख्य आठवणींची शिदोरी कायम सोबत राहील. सर्व मायबाप प्रेक्षकांचेही आभार. सगळ्यांची खूप आठवण येईल.
टिप्पण्या