मुख्य सामग्रीवर वगळा

नांदेडमध्ये बौद्धांना घर देता का घर...जयपाल गायकवाड

नटसम्राट मधला एक डायलॉग कुणी घर देता का घर सर्वांच्या लक्षात असेलच...अशीच परिस्थिती नांदेडमधील बौद्ध समाजातील लोकांवर येताना दिसून येतेय. अनेकांना वाटतेय मी नेहमी जातीविषयक विषयावरच बोलत असतो, नेहमी यावर बोलणं टाळण्याचे प्रयत्न करतो पण नाईलाजाने बोलावं लागतंय...

आज एका मित्राच्या फोन आला होता. 30 लाखा पर्यंत घर घ्यायचं आहे पण आपल्या समाजातील लोकांना घर देत नाहीयेत. मी त्याला म्हणलं हे काय नवीन आहे का ? मी 12 वर्षांपासून हे पाहतोय...कुठेही बांधकाम होत असलेल्या साईटवर जाऊन घर किंवा अपार्टमेंट पहा तुम्हाला त्यांचा माणूस संपूर्ण घर किंवा फ्लॅट दाखवून देईल, त्यानंतर त्याची किंमती पण सांगतील..मग तुमचं नाव विचारलं जाईल, आडनावावरून तुमची जात समजली नाहीतर तुम्ही ब्राह्मण का? मराठा ? असे स्पष्ट विचारतात. नाही बौद्ध आहोत असे म्हणले कि साहेब  बौद्ध आणि मुस्लिमांना घर देत नाहीत असे सांगितले जाते. हे सांगणारा त्यांचा व्यक्ती सुद्धा बौद्धच व्यक्ती कामाला ठेवलेला असतो.

असे प्रकार फक्त एक दोन जागी नाही तर जवळपास सर्वच बांधकाम व्यावसायिक नांदेडमध्ये भेदभाव करत आहेत. मागे 4 ते 5 वर्षांपूर्वी बियाणी यांनी बौद्धांसाठी दोन अपार्टमेंट बांधले होते.

फरांदे नगर, काबरा नगर, कॅनॉल रोड, मालेगाव रोड आदी भागात बौद्धांना नो एंट्री आहे. जे काही या भागात बौद्धांची घरं आहेत त्यांनी स्वतः प्लॉट घेऊन बांधकाम केलेली आहेत असे दिसून येते.

आज बौद्ध समाजातील लोकांना उच्च पदाच्या नौकऱ्या मिळत आहेत, अनेकांचे व्यवसाय सुरु झाले त्यामुळे उच्चभ्रू वस्त्यांमध्ये अनेकांनी घरे सुद्धा बांधली आहेत. अनेकांना कामाच्या व्यस्ततेत प्लॉट घेऊन घर बांधकाम करत बसण्यात वेळ नसतो त्यामुळे रेडीमेड तयार असलेलं घर घेण्याकडे त्यांचा कल आहे. अनेकांकडे पैसा असूनही घर घेताना सुद्धा त्यांची जात आडवी येते.

अनेकजण म्हणतात आम्ही जात पात मानत नाही. किती बौधेत्तर समाज बौद्धांना घरात भाड्याने ठेवतात ? आरक्षण बंद करा म्हणणारे अश्या पद्धतीने होणारे भेदभाव का रोखत नाहीत ?

बांधकाम व्यावसायिक भेदभाव करून एखाद्या समूहाला घर विकत नसतील तर अश्या बांधकामव्यावसायिकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी कायदेविषयक अभ्यासकांकडे जाणे आवश्यक आहे. हि पोस्ट आपल्या सर्वांना अलर्ट करण्यासाठी टाकतोय...नांदेड जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणतात पण इथल्याच लोकांना घर मिळत नाहीतर तुमची चळवळ कुणासाठी आहे ?

आजही प्रचंड जातीवाद नांदेड शहरात पावलोपावली दिसून येतो. जो अनुभवतात ते पत्रकारांकडे व्यक्त करतात. पत्रकारांचे हात बांधलेले असल्याने एकही पत्रकार यावर लिहणार नाही. यातील सर्व गोष्टी मी स्वतः पण अनुभवल्या आहेत. जे बौद्धांना घर देत नाहीत अश्या सर्व बांधकाम व्यावसायिकांच्या साईट वर जाऊन अनुभव घेऊन आलोय...

या भेदभावावर नांदेडमधल्या लोकांनी बांधकाम व्यावसायिकांविरोधात आवाज उठवावा...👍 आणि सर्वांना भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक वस्तीत, नगरात, कॉलनी, अपार्टमेंट मध्ये घर विकत मिळावे अशी अपेक्षा...

- जयपाल गायकवाड, नांदेड

टिप्पण्या