गंगाखेड आगाराला मिळाल्या दोन शिवशाही बसेस
प्रवाशांच्या सेवेत नवीन शिवशाही दाखल
गंगाखेड -
येथील बस आगारात शिवशाहीच्या दोन आसनी असणाऱ्या दोन बसेस उपलब्ध झाल्या असून या बससेवेचा शुभारंभ आज सोमवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन अॅड. गौतम दादा भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला.
गंगाखेड ते वल्लभनगर पुणेसाठी गंगाखेड स्थानकाहून सायंकाळी सहा वाजता वातानुकुलीत असणारी ही शिवशाही बस सोडली जाणार असून प्रवासभाडे ६५० रुपये आहे. परळी, अंबाजोगाई, पाटोदा, नगर, पुणे या मार्गाचा समावेश असणार आहे. लाल रंगातील सर्वसाधारण बस आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा देणाऱ्या परंतु अधिक भाडे आकारणी करणाऱ्या शिवनेरी बस यामध्ये शिवशाहीचा पर्याय ठेवत महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. काही महिन्यापूर्वी सुरू झालेल्या शिवशाही बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निम आराम बसच्या तुलनेत शिवशाहीचे काही प्रमाणात भाडे अधिक आहे. परंतु खासगी वाहतुकदारांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे खासगी वाहतुकीकडे गेलेला प्रवासी शिवशाही आल्यानंतर पुन्हा माघारी फिरल्याचे चित्र आहे.
गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघटनाने शिवशाही बस मिळावेत यासाठी सतत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे सत्त पाठपुरावा केला त्यात यश मिळाले असून दोन शिवशाही बस मिळाल्या आहेत.
शिवशाहीच्या शुभारंभ प्रसंगी गंगाखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, आगार प्रमुख डी.के.पौळ, नगरसेवक सत्यपाल साळवे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर इंगळे, रमेश कातकडे, विकास साळवे, सुनील कोनार्डे, महालींग भिसे, सुभाष शिंदे, रणधीरराजे भालेराव, प्रमोद मस्के, माधुरी राजेंद्र, सौ. मंजुषाताई जामगे, चिंतामणी साळवे, नंदू सोमाणी, मनसेचे बालाजी मुंडे, सुभाष देशमुख, आदींची यावेळी उपस्थिती होती.
टिप्पण्या