Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

ही कहाणी आहे वसमत तालुक्यातील कौठा या गावातील सुप्रिया पंढरकर या जिद्दी मुलीची!

कहाणी:सुप्रियाच्या जिद्दीची!

ही कहाणी आहे वसमत तालुक्यातील कौठा या गावातील सुप्रिया पंढरकर या जिद्दी मुलीची!
एका अतिसामान्य शेतक-याची ती मुलगी.शेती दीड एकर.त्यामुळं कष्टाशिवाय नव्हताच पर्याय.नाही तरी हा जमिनीचा तुकडा नव्हताच जगण्याची जोखीम घेणारा. तसं तिचं मूळ गाव सावंगी.घरची परिस्थिती अत्यंत बेताची.
त्यात सुप्रियाच्या बालपणीच झालेलं वडिलांचं निधन.तीन चिल्यापिल्यांना घेऊन शांताबाईंनी जगायचं कसं!
शांताबाईवर आभाळ कोसळलं!लेकरांच्या भवितव्यानं ती चिंतित झाली खरी पण धीर नाही ढळू दिला.
बांधली नेटानं हिम्मत.आतून आलेली ही हिम्मत.
या हिम्मतीनंच उचललं पाऊल.नवरा गेला म्हणजे सासरचा आधारच पडला निखळून.दुःख गिळून जगायचं ठरवलं तरी मायेची माणसं लागतातच मदतीला.शांताबाई आपलं बि-हाड घेऊन आली माहेरी.अर्थात कौठ्याला.तिथं भावाच्या आधारानं करू लागली जगण्याची जुळवाजुळव.

'धग' कादंबरीतल्या कौतिकच्याही काळजाचा कालवा व्हावा असलं दुःख वाहात होतं शांताक्काच्या या जित्याजागत्या कहाणीतून.

नाही सांगावं लागत कोलमडून पडलेल्या माणसाला कसं उठून बसायचं ते.कलाकलानं जमून येतं बेदखल बळ.
शांताबाईंनी बांधला धीर.कौठ्याच्या जि.प.शाळेत नोंदवलं सुप्रियाचं नाव.वडीलांचं नसणं खूप यातनादायी व्हायचं सुप्रियाला.इतर मुलींचे वडील आपल्या मुलीची चौकशी करायला यायचे तेव्हा नकळत हिच्या डोळ्यात समुद्र साचायचा.
कितीही कुरवाळलं दुःखाला तरी नाहीच थांबायचं त्याचं वाहाणं निरंतर.आईच्या उशाला जागल करून बसलेलं स्वप्न.त्या स्वप्नाची सारी भिस्त आपल्यावरच!
बालवयातच उगवत गेली या चिमुरड्या मुलीच्या मनात जबरदस्त जिद्द.
ही जिद्द शाळेतून महाविद्यालयात येईपर्यंत झाली खूपच दमदार.
'आई,नको गं काळजी करूस माझी.मी फेडीन तुझे पांग!'
असलं आश्वासन झरझर उतरत यायचं लेकीच्या वागण्या-बोलण्यातून.
सुप्रियाचं बोलणंही तेवढंच तालेवार.उठून पडावं असं वक्तृत्व.याच वक्तृत्वाच्या सामर्थ्यानं होत गेलं तिचं व्यक्तिमत्त्व टाळसार.वसमतचं प्रसिद्ध बहिर्जी महाविद्यालय.जिथून आला इंद्रजित भालेराव नावाचा कवी नाक्यावर.आणखीही सांगता येतील खूप नावं.आमची भार्या पुष्पा दळवी यांनीही घेतली तीन दशकापूर्वी पदवी याच विद्यासंकुलातून.असो.हे झालं जरासं विषयांतर!
बहिर्जीतून सुप्रियानं घेतली पदवी आणि लागली एम.पी.एस.सी.च्या तयारीला.निर्धारानं उचललं पाऊलं म्हणजे कितीही कठीण वाट वाटायला लागते धाकटी.तिचा धाकही धरून ठेवत नाही धक्के! जिद्द आणि कठोर परिश्रमाची पायवाट नक्कीच पोचते पहाटेच्या प्रकाशापर्यंत!
सुप्रियाचा निर्धार नव्हताच नजरेआड करण्यासारखा.आईला दिलेलं मूक आश्वासन हीच सुप्रियाच्या जिद्दीची सार्थ शिदोरी.त्यातूनच तिची तेजोमय बांधणी.झाकत नसतं तेज तसूभरही जिद्दीच्या तीव्रतेचं.कितीही ठेवतो म्हटलं झाकून तरीही!

कालच आला वाट काढत सुप्रियाच्या घराची एमपीएससीचा निकाल.एका अत्यल्प भूधारक शेतक-याची प्रतिकूल परिस्थितीतून आलेली सुप्रिया नावाची मुलगी पोलीस उप निरीक्षक झालीय ही वार्ता आई शांताबाई किंवा शिक्षिका शारदा कदम यांनाच सुखावून टाकणारी नाही; तुमच्या आमच्याही काळजात करकरीत आनंद पेरणारी आहे खरी..चला आपण सुप्रियाचं आणि तिची आई शांताबाईचं अभिनंदन करू या!