महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी झाली. समाजाच्या सर्व स्तरातून त्या बंदीचे स्वागत होत आहे. या प्लॅस्टिकबंदीमागे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका आहे. पर्यावरण आणि मानवहितासाठी प्लॅस्टिकबंदी का अत्यावश्यक होती याबाबत आदित्य ठाकरे यांनी ‘एनडीटीव्ही’च्या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखातून विस्तृत माहिती दिली. त्या लेखाचा हा अनुवाद…
अखेर महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी झाली आहे. हे खूप आधीच घडायला हवे होते. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य आहे. एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील १८वे राज्य आहे. खरे तर आपण पहिले असायला हवे होतो. उशीर झाला, पण ही बंदी आपण गंभीरपणे घेतली ही आनंदाची गोष्ट आहे.
प्लॅस्टिकबंदीचे यश हे सर्वस्वी सरकार आणि जनतेवर अवलंबून आहे. सरकारने कायदा बनवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आता ही बंदी म्हणजे नागरिकांची एक चळवळ बनली असून स्वयंसेवी संस्था, शाळा, नामांकित व्यक्ती, उद्योगपती यांनीही प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.
फुलांचे व्यापारी आता कापडी पिशव्यांमधून फुले पाठवत आहेत. भाज्यांसाठी कापडी पिशव्या वापरल्या जात आहेत. महिला स्वयंसहाय्यता गट (वुमेन सेल्फ-हेल्प ग्रूप) आता कापड आणि ज्यूटच्या पिशव्यांकडे उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहू लागल्या आहेत. औषधेही आता कागदाच्या पाकिटांमध्ये येत आहेत. चहा-कॉफीची दुकाने, महाविद्यालयांच्या कॅन्टीन आणि हॉटेलांमधूनही प्लॅस्टिक हद्दपार होऊ लागले आहे. पेपर स्ट्रॉ आणि पेपर कप्सचा वापर सुरू झाला आहे. कोका-कोला आणि बिसलरीसारख्या कंपन्यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील प्लॅस्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हे या बंदीमागचे यश असून त्याबद्दल मला नागरिकांचा अभिमान वाटतो.
खरं तर गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये याची सुरुवात झाली होती. त्या वेळी गटारे तुंबल्याने मुंबईत पाणी साचले होते. आपत्कालीन नियंत्रण कक्षात आम्ही त्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या विविध भागांतील छायाचित्रे पाहिली. पाणी साचण्यामागचे कारण बांधकामाच्या ठिकाणचे मातीचे ढिगारे होतेच, पण महत्त्वाचे कारण होते ते प्लॅस्टिक कचरा. टनावारी प्लॅस्टिक कचरा गटारांमध्ये अडकल्यानेच पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे प्लॅस्टिक हीच मुख्य समस्या होती आणि ती दूर करणे महत्त्वाचे होते.
प्लॅस्टिक समस्येबाबत मी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याशी चर्चा केली आणि प्लॅस्टिक प्रदूषण दूर करण्यासाठी बंदीचे पाऊल उचलायला हवे असे सांगितले. प्लॅस्टिक व्यवसाय आणि वापराशी संबंधित प्रत्येकापर्यंत पोहोचलो. तज्ञांशी बोललो आणि विशेषकरून प्लॅस्टिकच्या प्रदूषणाविरुद्ध लढणारे अफरोझ शाह, जुही चावला आणि दिया मिर्झा यांच्याबरोबर चर्चा केली. सतीश गवई, अजोय मेहता, प्रवीण परदेशी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. अनबालगम आदी अधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभले.
प्लॅस्टिकबंदी करताना सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालायची का? सर्व प्लॅस्टिक धोकादायक आहे का? हा मोठा प्रश्न होता. त्याचे उत्तर नकारार्थीच होते. कारण प्लॅस्टिकची निर्मिती हीच मुळात एक पर्याय म्हणून झाली होती. दीर्घकाळ टिकून राहणारे आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्लॅस्टिककडे पाहिले गेले. जंगलातील झाडे तोडण्यापेक्षा आपण प्लॅस्टिकचे फर्निचर वापरायला सुरुवात केली. पर्यावरणातून मिळणारे कागद आणि इतर वस्तू वापण्यापेक्षा प्लॅस्टिकचा पर्याय म्हणून स्वीकार केला.
प्लॅस्टिकचा वापर आपण मोठय़ा प्रमाणात सुरू केला. पण त्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन आपण स्वतŠच करू लागल्याने ते विध्वंसक ठरू लागले. भरमसाट निर्मिती, भरपूर प्रमाणात वापर आणि विल्हेवाटीबाबतचा निष्काळजीपणा अधिक विध्वंसक ठरला. त्यामुळे विघटन होत नाही म्हणून आपण प्लॅस्टिकला दोष देऊ शकत नाही. आपण आपल्यालाच दोष दिला पाहिजे. कारण आपणच प्लॅस्टिकचे रूपांतर प्रदूषणाच्या राक्षसामध्ये केले.
आता कशाकशावर बंदी घातली आहे असा प्रश्न पडेल. एकदाच वापरले जाणारे प्लॅस्टिक म्हणजेच प्लॅस्टिक पिशव्या, कप, प्लेट्स, स्ट्रॉ, कटलरी या सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. पाण्याच्या बाटल्यांचे काय? या प्रश्नाला मला नेहमी सामोरे जावे लागते. सध्या तरी त्यांना पर्याय नसल्याने त्यावर बंदी घालण्याची गरज नाही. काचेच्या बाटल्याही एकच वेळ वापरल्या जाऊ शकतात. धातूच्या बाटल्यांना स्वच्छतेची गरज असते. दोन्ही प्रकारच्या बाटल्यांना स्वच्छतेची गरज असते आणि त्यासाठी २-४ लीटर पाणी लागते. त्यामुळे सध्या तरी त्या मोठय़ा प्रमाणात वापरणे आपल्या देशाला परवडण्यासारखे नाही. पर्यावरणमंत्री कदम आणि मी आम्ही दोघांनी त्यासाठी एक प्रयत्न सुरू केला. हॉटेल्स, रुग्णालये, विमानतळे आणि शिक्षण संस्थांनी तेथील वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या जमा करून त्या रिसायकलिंगला पाठवाव्यात यासाठी पावले उचलली.
मायक्रो-बीड प्लॅस्टिकवर बंदी घालणे हे आपले पुढचे लक्ष्य आहे. ती एक जागतिक समस्या आहे. त्या प्लॅस्टिकचा वापर स्क्रब्स आणि इतर कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये केला जातो. चालू वर्षी अखेरपर्यंत त्या प्लॅस्टिकवरही बंदी घालावी अशी विनंती मी पर्यावरणमंत्र्यांना केली आहे. प्लॅस्टिकबंदी प्रभावीपणे लागू करण्यामागे एका व्यक्तीला श्रेय द्यावे लागेल आणि ते म्हणजे पर्यावरणमंत्री रामदास कदम.
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद हिंदुस्थानकडे होते आणि त्याची संकल्पना ‘बीट प्लॅस्टिक पोल्युशन’ होती याचा मला अभिमान आहे. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास हिंदुस्थानसारखा उत्तम देश नाही. थोडं मागे जाऊन पाहिले तर आपल्याला कळेल की आपण निसर्गाचे पूजन करत होतो. ‘पंचमहाभूतं’ म्हणजेच पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश ही पाच तत्त्वे आपल्याला जीवनात आवश्यक असलेले सर्वकाही देतात. पण प्रदूषणामुळे आपण या निसर्गापासून दूर जाऊ लागलो आहोत. आता हे प्रदूषण दूर करून आपण निसर्गाच्या असे जवळ जायला हवे की जगालाही प्रोत्साहन मिळेल
टिप्पण्या