२०१९च्या लोकसभा निवडणुकांवर साऱ्याच पक्षांचं लक्ष केंद्रीत झालं असून भाजप आणि मित्र पक्षांचं गणित बसणार का?, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. पण बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या जदयू आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपनं बिहारमध्ये स्वबळावर लढून दाखवावं, पुन्हा विजय मिळवणं कठीण, असल्याचा इशारा जदयूचे नेते संजय सिंह यांनी दिला आहे.
२०१४ आणि २०१९ यामध्ये प्रचंड फरक पडला आहे. भाजपला चांगलंच माहीत आहे की नितीश कुमारांच्या पाठिंब्याशिवाय त्यांचा विजय शक्य होणार नाही, असं संजय सिंह म्हणाले आहेत.
दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागांवरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे. जदयू २५ जागांची मागणी करत आहे तर भाजप देखील २२ जागांपेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाही. त्यामुळे बिहारचे राजकारण पुन्हा रंग घेऊ लागले आहे. २०१९ च्या लोकसभा आणि २०२० मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा या दोन्ही संदर्भात एकाच वेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र जदयू कोणत्याही प्रकारे मागे पाऊल घेण्यास तयार नाही. कारण भाजपला जदयूसोबत येण्याची इच्छा नसल्यास ते सर्व ४० जागांवर लढू शकतील, असं संजय सिंह यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.दरम्यान, या आधी २०१४च्या लोकसभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करत नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले. त्यानंतर लालू यादव यांच्या राजदला सोबत घेत त्यांनी बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. पण लालू यादव आणि कुटुंबीयांच्या कारनाम्यांवर नाराज नितीश कुमार यांनी सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपची सोबत घेतली आणि लालू यादव यांना दूर केलं. पण लोकसभेत भाजपशी जागांवरून पुन्हा खटके उडू लागले आहेत. त्यामुळे आता बिहारी नाटकाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टिप्पण्या