(लेखकःका.रा.चव्हाण )
*******************
मानवी भाव-भावनांना उजेड देणारं प्रकाशतत्व- ' दिवेलागण.'
*************************************
समीक्षा
मालवण्या दिशा!काळोखले नभ!
उगा तगमग!पाखरांची!!
दूरातल्या गावी!दिसे दिपखुणा!
उभा सांजमेणा!उंब-यातं!!
हंबरल्या धेनू!वासरे व्याकुळ!
काळोख कमळ!मिटू आले!!
सुनी गाव वाट!सुना सुना पार!
एक नवी धारं काळोखाला!!
काळोख डोहात!डुचमळे सांज!
वारीयाची झांज!पश्चिमेला!!
अहाहा.!काय सुंदर.!मनोरम.!!वर्णन केले आहे या अभंगवृत्तात होय ना.?
हा सुंदर अभंग आहे,प्रसिद्ध ललित-साहित्य लेखक श्री.रविंद्र जवादे यांच्या "दिवेलागण"या ललित-लेखसंग्रहात अंतर्भूत केलेल्या "सांजमेणा"या लेखातील.
ह्या "दिवेलागण"ललित-लेखसंग्रहाची प्रथमावृत्ती,इ.स.१८जाने१९१७ ला ' श्री.सचिन उपाध्याय विजय प्रकाशन,सिताबर्डी,नागपूर.यांनी प्रकाशीत केलेली आहे.हा लेखसंग्रह म्हणजे ललित-भाषासौंदर्याचा एक उत्तम नमुना आहे असे म्हणणे मुळीच अतिशयोक्ती ठरू नये.कारण त्यामध्ये लेखकांनी निसर्ग अन मानवाच्या मनोसौंदर्याबरोबरच भाषासौंदर्यांचेही पैलू मोठ्या खुबीने कसोसीने व कलात्मककतेने 'सांजमेणा', 'चांदणवेळा', 'गंधवेणा', 'रात्रराधा', 'स्वर काकड आरतीचे', 'व'दिवेलागण'यांसारख्या सुंदरात सुंदर लेखांमधून श्री.रविंद्र जवादे यांनी वाचकांच्या नजरेत पेरण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.
"दिवेलागण"मध्ये रविंद्र जवादे या लेखकांनी संगीताचं थिरकणं,पावलांना स्नेहल भेटीचे डोहाळे लागणं,भरजरी स्वप्नंना वास्तवाचे पंख फुटणं,तिचं गालावर हलकेच चंद्रखुण उमटवणं,डोळ्यांत हलकेच ऋतू फुलून येणं,डोळ्यांत बालपण रुजणं,अश्या सुंदर सुंदर
लालित्यपूर्ण कल्पना पुस्तकभर विखुरलेल्या आहेत.
'बिलवरी स्वप्ने,गालावर चंद्रखुण,कांचणी पंख,काच पाणी,गंधीत कोडं,दुधरंगी प्रकाश ,
तकलादू हिंमत,अश्या नाविन्यपूर्ण विशेषणांनी नटलेले शब्द,वाक्प्रचार,निसर्गातील नीर्जीवही
घटकांना चेतनगुणोक्ती,रूपक,उपमा यांसारख्या अलंकाकारांचा काटेकोर उपयोग करून लेखांना जीवंतपणा देणा-या नवशब्दनिर्मितीच्या दृष्टीनेही या लेखसंग्रहातील'सांजमेणा', 'गंधवेणा', हे ललित-लेख खरे ठरलेले आहेत.
यांची आणखी काही सुंदर उदाहरणे वाचकांच्या लक्षात आणून देणे अनुप्रास्त वाटते ती अशी,
"दिवेलागण"मधील 'चांदणवेळा'या ललित लेखाततील,
"दुधरंगी प्रकाशात झाडे नटून घेतात."
'दिवेलागण'या लेखातील,
"एखादा मुलगा हरिण ओढीनं दिव्याच्या कलकलत्या उजेडात वाचू पाहतोय आपलं अनाकलनीय आयुष्य."
'चांदणवेळ' या लेखातून रविंद्र जवादे वाचकाला निवेदन करतात की,
-"खरं तर अशा देखण्या रात्री कधी कधीच येतात जीवनात उजेड पेरणी घेऊन...मग अशी अनोखी चांदणवेळ पुढे आठवण्यासाठी जपून ठेवायची असतेय अलवार हृदयात..."
ही वाक्यांचा वर नमुद केलेल्या भाषासौंदर्याच्या बाबतीत वाचकाला नक्कीच विचार करता येईल.
'दिवेलाण'हा ललित-लेखसंग्रह शब्द लालित्यानेच नटलेला नाही तर,त्याला श्री जवादे यांनी एका सकारात्मक वैचारिक बैठकीत बसवून अध्यात्मिक विचार सौंदर्यही बहाल केलेले आहे असे दिसून येते.
उदाः'सांजमेणा'या लेखातील नियतीच्या नियमाबाबत लेखक लिहितात की,
"तसं सृष्टीच्या चिरंतन नियमांचं पालन करणं एवढच माणसाचं प्राक्तन..!ऋतूंचं अनाकलनीय तत्व अन दिवस-रात्रीचं चक्र माणसाच्या बुद्धीपुढचा एक यक्षप्रश्न...!माणसाने केवळ मुकाटपणे जपत रहावं नियमांना..!अशी जणू नियतीचीच योजना..!"
हा विचार लक्षात घ्यावा असाच आहे.
एखाद्या गहन गोष्टीचं गुढ परिणामकारकपणे उकलण्यासाठी व ते साधकांना पटवून देण्यासाठी सुंदर,सुगम,बोधपर भाषेतून भाष्य करण्याची हातोटी यशस्वी लेखकाजवळ असते ती रविंद्र जवादेंकडेही आहे हे निश्चितच 'दिवेलागण'ववाचताना वाचकाच्या लक्षात येईल हे मी वेगळे का सांगावे.?परंतु मला हे तर,नक्कीच सांगावे लागेल की,'दिवेलागण'मध्ये लेखक जेव्हा निवेदन करताना आढळतात,तेव्हा त्यांच्या निवेदनाला,शाश्वत विचाराची धार व भाषा सौंदर्याची किणार लाभलेली आहे आहे असेच जाणवत नाही तर,त्यांचे निवेदन. ते संस्कृत भाषेत नसले तरीही, जणू काय एखादे सुंदर सुभाषितच आहे असे वारंवार वाटल्याशिवाय राहत नाही.याचे एक सुंदर उदाहरणच इथे लिहिणे पसंत करेन.
"विश्वाच्या अवाढव्य पसा-यात सांज दररोज होणार अन दिवसही उगवणार...फक्त आपण येवढच करायचं, काळोखाचं अनोखं लावण्य जपून ठेवायचं..हृदयाच्या कप्प्यात...अन पापण्यांच्या लडिवाळ काठांवर आयुष्यभरासाठी जपून ठेवायचं एक प्रकाशतत्व....आपलं हक्काचं..आपल्याचसाठी...!"
आहे ना एक सुंदर अध्यात्म मांडणारं सुंदर सुभाषितच.?या समीक्षेच्या आरंभालाच दिलेला 'सांजमेणा'या लेखातील अभंगही रसिकाला असेच एक सुभाषित किंवा एक मंगल स्तोत्रच वाटत असेल तर,त्यात वावगे ते काय ?असो.
'दिवेलागण'वाचताना वाचकाने एवढे मात्र निश्चितच लक्षात घ्यावे की,यातील ३०लेखांपैकी'गंधवेणा,सांजमेणा,हे लेख असोकी,चांदणवेळा,रात्रराधा,हे लेख असो..सर्वच लेखांतील रविंद्र जवादे यांची भाषा सरळ,सोपी,सुघळ,सुबोध,अशी असून वाचकाला प्रभावीत करणारी अशीच आहे.बहुतांश लेख तर,या बाबतीत मनाची पकड साधतात.
श्री ,रविंद्र जवादे यांच्या ' दिवेलागण' मधील शेवटचा लेख म्हणजेच पुस्तकाचे शीर्षकच.या हा लेख तर भाषासौंदर्याच्या बाबतीत मैलाचा दगडच मानावा असाच आहे.कारण या लेखात दिवेलागणीच्या वेळेचं सुंदर वर्णन चीरस्थायी शाश्वत सत्य अन सुंदर विचाराचा प्रकाश पेरणारा असा आहे.
त्यात लेखक लिहीतात की,
" खरं तर दिवा प्रकाशाचा मांगल्यदूत.!काळोखाच्या गहन आवर्तात मन उजेडाची प्रार्थना करू लागतय..काळोखाच्या अमंगल सावली न पडू देणं यासाठी दिव्याचा जन्म..!दिवा इवलासा पण उजेड देणारा..!मंगलाचं भान देणारा...!दिवाच उजळून टाकतोय चराचर..अन माणसाचं जीवनही..!म्हणूनच विश्वातल्या कुठल्याही संस्कृतीत दिव्याभोवती मंगलाचं वलय निर्माण झालय..!"
'दिवेलागण' हा रविंद्र जवादेंचा तब्बल अप्रतिमातप्रतिम तब्बल३०लेखांचा संग्रह.ज्याचे अत्यंत बोलके मुखपृष्ठ 'श्री संतुक गोलेगावकर'यांनी केलेले असून,ज्याला अतिशय संक्षीप्त परंतु या ललित-संग्रहाच्या लेखनाच्याबाबत रविंद्र जवादे हे यशश्वी ठरल्याची ग्वाही देणारा,प्रस्तावनावजा आभिप्राय हा ख्यातनाम साहहित्यिक 'मधू मंगेश कर्णिक,मुंबई'यांनी दिलेला आहे.असे हे सर्वांगाने आंतरबाह्य सुंदर व राजबींडे 'दिवेलागण'वाचकाच्या पसंतीस नक्कीच हे त्रिकालाबाधीत सत्य वर्तवताना मला मनस्वी आनंद होतो आहे.प्रस्तुत पुस्तकाला महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरीलही पाच प्रतिष्ठित पुरस्कार अल्पावधीत प्राप्त झालेले आहेत.हे खरे लेखकाच्या लेखणीचे अन लेखकाच्या कलात्मक खूबीने केलेल्या कसदार ललित लेखणाचे यश आहे असे मला प्रांजळपणे लिहावेच लागते.नव्हे तो माझा धर्मच आहे.'दिवेलागण'मधील अनेकावीध लेख हे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने जर अभ्यासक्रमात व विद्यापीठांनी उच्च महाविद्यालयीन पदवीच्या अभ्यासक्रमात समावीष्ट केलेत तर,विद्याथ्यांना ललित-लेखनाचे,लालित्यपूर्ण भाषेच्या तंत्राचा आभ्यास कण्याच्या बाबतीत निश्चितच उपयुक्त ठरेल असेच हे पुस्तक आहे अशी मला खात्री आहे.
कारणच तसे आहे....रविंद्र जववादेंच्या भाषेतच ते सांगणे उचित मानतो...
" दिवेलागण-एक प्रसन्नवेळः
अंधार आणि उजेडाच्या सिमेवरची....!
चरा-चरातल्या निबीड काळोखासोबतच,
मना-मनाला प्रकाशमय करणारी...!"
'दिवेलागण'ही प्रभावळ श्री रविंद्र जवादेंच्या साहित्यसंसार आपल्या शाश्वत प्रकाशाने उजळून टाको...अंकु श्या ओलेत्या मनोभावनेच्या पुढील यशस्वी वाटचालीस त्यांना काळजातून शुभेच्छा देतो....!
तुर्तास येथेचथांबतो.
***
पुस्तकः'दिवेलागण'
(ललित लेखसंग्रह.)
लेखकःश्री.रविंद्र जवादे.
प्रकाशकःविजय प्रकाशन
सिताबर्डी नागपूर.
मूल्यः२००/-
------------------------------------
समीक्षकः
का.रा.चव्हाण,परभणी.
८५५२८३३८३९.
टिप्पण्या