खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा पूर्वीचा भागीदार चंदनकुमार यानेच २० लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवली. विशेष म्हणजे चव्हाण कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी तो त्यांच्या सोबतच बसून होता.पोलिसांनी चंदनकुमार याच्यासह पाचजणांना या खून प्रकरणी अटक केली आहे.मयत अविनाश चव्हाण याचा पूर्वीचा भागीदार व कुमार मॅथ्स क्लासेसचा संचालक चंदनकुमार छोटेलाल शर्मा यानेच २० लाखांची सुपारी दिली होती. अविनाश चव्हाण याच्या कुटुंबीयांनी या खून प्रकरणी अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आज पाच जणांच्या अटकेची माहिती दिल्यानंतर साडे अकरा वाजता अविनाश चव्हाण यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला व अंतिम संस्कार करण्यात आले.या खून प्रकरणातील मास्टर मार्इंड कुमार मॅथ्स क्लासेसचा संचालक चंदनकुमार छोटेलाल शर्मा आहे. तो अविनाश चव्हाण याचा या क्लासेसच्या धंद्यातील पूर्वीचा भागीदार होता. त्याने महेशचंद्र प्रभाकर गोगडे (रेड्डी) याच्याशी संपर्क केला. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हालकी येथील शरद सूर्यकांत घुमे याला तयार केला. घुमे याने करण चंद्रपालसिंग गहेरवार याच्यावर जबाबदारी सोपवली. त्याने अक्षय शेंडगे याला सोबत घेऊन त्यांच्या मोटारसायकलवर बसून अविनाश चव्हाण याला रस्त्यात गाठले व त्याच्यावर गोळ्या झाडल्या. २० लाखांच्या सुपारीत ८ लाख ५० हजार रुपये त्यांना देण्यात आले होते. परळी येथील एका इराणी व्यक्तीकडून दीड लाख रुपयांत एक पिस्तुल आणि १५ काडतुसे मिळवण्यात आली. पिस्तुलची ट्रायल अंबा साखर कारखान्याच्या परिसरात घेण्यात आली. शरद घुमे याच्या घरातून पोलिसांनी पिस्तुल, काडतुसे, मोटारसायकल आणि२ लाख ३१ हजार रुपये जप्त केले आहेत.
टिप्पण्या