राणीसावरगाव, (प्रतिनिधी ) : शैक्षणिक व व्यापारी कामकाजासाठी ग्रामीण भागातील जनतेला सोयीचे व्हावे यासाठी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव मार्गे परभणी ते लातुर नवीन बसेस सुरू करण्याची मागणी सरपंच सोमनाथ कुदमुळे यांच्या सह गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
श्री रेणुका देवीच्या तिर्थक्षेत्राचे ठिकाण व परभणी जिल्हयातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार पेठ आहे. येथुन मोठ्या प्रमाणावर लातुर येथे व्यापारासाठी व्यापारी ये जा करतात. तसेच महाविदयालयीन शिक्षण घेण्यासाठी गंगाखेड, पालम, अहमदपूर तालुक्यातील जवळपास शंभर गावातील मुले मुली शिक्षणासाठी लातूरला अपडाऊन करत असताना राणीसावरगाव मार्गे थेट प्रवासासाठी एकही बस उपलब्ध नाही. रात्री उशिरा लातुर येथे मुक्काम करावा लागतो.
तसेच गंगाखेड व परभणी या जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना गंगाखेड येथुन रात्री सात वाजता शेवटची बस आहे. त्यानंतर खाजगी वाहवाहनांच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वरील परिस्थितीचा विचार करून आपल्या परभणी आगारातुन सकाळी सहा ते सात वाजता व सायंकाळी सात वाजता अशा दोन बसेस नव्याने सुरू करण्यात याव्यात अशी राणीसावरगाव परिसरातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे.
विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आलेल्या निवेदनावर राणीसावरगाव चे सरपंच सोमनाथ कुदमुळे, माजी सरपंच प्रा.पी.एल.राठोड, सय्यद अल्ताफ सय्यद अकबरसाहब,सुरेश चव्हाण,भुषण गळाकाटु, एकनाथ आडे, माधव राठोड,महारूद्र बेंबळग,बसलिंगआप्पा चलोदे, मैनुद्दीन तांबोळी, रमेश कुलकर्णी आदींनी तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
टिप्पण्या