मुख्य सामग्रीवर वगळा

नवजात अर्भकाला टाकून मातेने केला पोबारा

नवजात अर्भकाला टाकून मातेने केला पोबारा
प्रतिनिधी। राणी सावरगाव

मानवतेला काळीमा फासणारी घटना गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी परिसरात घडल्याचे समोर आले आहे. एका नवजात स्त्री अर्भकाला काटेरी झुडुपात फेकून मातेने पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तालुक्यातील पिंपळदरी ते निळानाईकतांडा येथे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास एक शेतकरी घरी जात असताना बाजूला असलेल्या काटेरी झुडपातून त्याला नवजात बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाजाच्या दिशेने गेला असता त्या ठिकाणी नुकतेच जन्मलेले स्त्री अर्भक त्याला आढळले. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना याबद्दल कळवले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर नवजात अर्भकास ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला उपजिल्हा रूग्णालय गंगाखेड येथे दाखल करण्यात आले आहे. या नवजात अर्भकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या