मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील ठिकठिकाणी हिंसक वळण लागले होते. दरम्यान, मराठा मोर्चांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, हिंसा करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी या याचितेतून करण्यात आली आहे. मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडून आजचा महाराष्ट्र बंद शांततेत पुकारण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतरही पुणे, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध शहरांत आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दरम्यान, मराठा मोर्चांविरोधात द्वारकानाथ पाटील यांनी याचिका दाखल केली असून मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या हिंसक आंदोलनांना प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात द्वारकानाथ पाटील यांच्यावतीने अॅड. आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसक कृत्ये करणाऱ्यांना शोधून काढावे, हिंसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच अशा मोर्चांवर बंद घालावी, अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे.
टिप्पण्या