निजामपूर-जैताणे (धुळे) : 9 ऑगस्टला दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळण्यासह आरक्षणविरोधी, डॉ. आंबेडकरविरोधी व संविधानविरोधी घोषणाबाजीचा घृणास्पद प्रकार घडला. त्याचा निषेध करण्यासाठी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शुक्रवारी (ता.10) सायंकाळी भारिप बहुजन महासंघातर्फे निजामपूर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. ठाणे अंमलदार रामलाल कोकणी यांनी निवेदन स्वीकारले. कार्यकर्त्यांनी संबंधितांवर देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणीही यावेळी केली.कार्यकर्त्यांनी सुरवातीला पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली. परंतु संबंधित अनुचित प्रकार हा निजामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला नसल्याने एफआयआर दाखल करता येणार नाही. अशी समज सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर व हवालदार जयराज शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनला निवेदन देत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला. एपीआय खेडकर यांनीही जिल्हा पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तक्रार शासनापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र जाधव, साक्री तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख कमलाकर मोहिते, जैताणे शहराध्यक्ष सिद्धार्थ जगदेव, सामाजिक कार्यकर्ते देवाजी जाधव, संगम बागुल, आदिवासी संघटनेचे किशोर कोकणी आदींनी 'सकाळ'कडे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. "संविधान जाळणारा भारतीय असूच शकत नाही" अशी प्रतिक्रिया देवाजी जाधव यांनी दिली.निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र जाधव, साक्री तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख कमलाकर मोहिते, साक्री शहराध्यक्ष सतीश मोहिते, जैताणे शहराध्यक्ष सिद्धार्थ जगदेव, निजामपूर शहराध्यक्ष सुरेश मोरे, पेरेजपूर शाखाध्यक्ष विकास मोरे, संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास बागुल, किशोर कोकणी, कल्पेश अहिरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी जाधव, संगम बागुल, गुलाब जगदेव, संजय बेडसे, प्रताप जाधव, योगेश जाधव आदींसह सुमारे पन्नास दलित व आदिवासी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
टिप्पण्या