पुणे: सध्या झी मराठी वाहिनीवर गाजत असलेली तुला पाहते रे ही मालिका अडचणीत आली आहे. कारण ही मालिका बंद करावी, अशी मागणी पुण्यात करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी हे निवेदन पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिलं. या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश नाही, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे, असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला.
प्रदीप नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, “या मालिकेत 20 वर्षाची मुलगी 40 वर्ष युवकाच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील 20 वर्षीय मुलीचे लग्न 40 वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी”
टिप्पण्या