मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: 'ताईंना खोटं जमलं नाही...' पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट !

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले.
राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली. परळीतून धनंजय मुंडे यांना 1,21,555 एवढी मतं मिळाली असून, पंकजा मुंडेंना 91,031 मतांवर समाधान मानावं लागलं. धनंजय मुंडेंनी जवळपास 30,524 मताधिक्यानं पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना अनाकलनीय असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्टही टाकली आहे. या पोस्टमध्ये पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्या लिहितात, मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेनही. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच. तो अंतिम असतो बस्स!!, ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!!!, मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं "मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा". या राजकारणात मी यशस्वी होणं हाही पराभव आहे, असंही मला वाटत राहिलं. 19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते सरळ मतदानासाठीच 21 तारखेला सकाळी बाहेर पडले.
माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले. गोपीनाथ गड येथे मध्ये साहेबांचे दर्शन घेतले आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले. मला मतं मिळाली नसतीलही, मला मन जिंकताही आली नसतील, पण एक मात्र नक्की आहे ,’असत्य मला वागता आलं नाही’हे शत्रूही कबूल करेल. या पोस्टच्या खाली येणारे ट्रोल विरोधक जाहीरपणे नाही, पण एकांतात मान्यच करतील ‘ताईना खोटं नाही जमलं...’, विश्वास ठेवा मी 'त्या 'क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही. मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले हेही नक्की. इतकी मी प्रगल्भ नक्कीच आहे हो. मंचावर त्या दिवशी मी खूप सावरलं स्वतःला, मीडिया ही गेला होता. मी काही प्रवेश ही घेतले पण गाडीच्या दिशेने जाताना कोसळले, त्याबद्दल जरा अवघड वाटत आहे. त्याचा अर्थ घेणारे घेतीलच पण जमलं तर विश्वास ठेवा ..माझ्या स्वाभिमानी स्वभावाला खूप लागलं, माझं कोलमडून पडणं अगदी निवडणूक हरल्या पेक्षाही लागलं. मी आजवर राजकीय जीवनात जे केलं ते लोकांसाठी त्या सर्व भावना आणि स्व.मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे. निकालाची जबाबदारी फक्त माझी आहे, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.

टिप्पण्या