मुख्य सामग्रीवर वगळा

शरद पवार 6 नोव्हेंबरला परभणी, हिंगोलीच्या दौऱ्यावर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या बुधवारी 6 नोव्हेंबरला मराठवाड्याचा पाहणी दौरा करणार आहेत. यावेळी परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते करणार आहेत. शरद पवारांसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील असणार आहेत. यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या दौर्‍यात शरद पवार परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सर्वप्रथम परभणीतील सेलू तालुक्यातील काही भागांची त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.परतीच्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरीचं मोठं नुकसान झालं आहे. हाताला आलेली पिके काढण्याचे दिवस होते आणि तोच पावसाने जोरदार हजेरी लावली.विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झालं आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर डाळींब, पपई, या फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान झालं आहे.

टिप्पण्या