मुख्य सामग्रीवर वगळा

पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव कमी पडला : फडणवीसंचा शरद पवार यांना टोला

पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव थोडा कमी पडला असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी साताऱ्यातली सभा घेतली तेव्हा पाऊस पडला. त्या पावसातही ते बोलत राहिले. मी लोकसभेच्या वेळी चूक केली होती ती सुधारा, मी मान्य करतो तेव्हा ती चूक करायला नको होती असं शरद पवार भाषणात म्हणाले होते. या भाषणानंतर सोशल मीडिया असो किंवा राज्यात असो अवघं वातावरणच बदलून गेलं. त्याचा परिणाम मतदानावरही झाला. आज वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी फराळासाठी पत्रकारांना बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागते आहे, मात्र असं काहीही ठरलेलं नाही. आम्ही फार आडमुठी भूमिका घेणार नाही. शिवसेनेसोबत चर्चा करणार आणि मेरिटनुसार जे काही आहे ते ठरणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी पावसात भिजावं लागतं, त्याबाबत आमचा अनुभव कमी पडला असाही टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं नाव न घेता लगावला.शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली आणि त्याचा परिणाम निवडूक निकाल आणि राज्यातल्या राजकारणावर दिसून आला. त्या एका भाषणाने भाकरी फिरवली. पर्यायाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. कौल जरी महायुतीला मिळाला असला तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. विरोधकांना चेहराच उरलेला नाही, समोर पैलवान दिसतच नाही या सगळ्या उत्तरांना शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्याचा परिणाम मतदानावरही झाल्याचं पाहण्यास मिळालं.

टिप्पण्या