
मुंबई: विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पुर्नवसनासाठी स्थानिक पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी दोन आमदारांनी पंकजा यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. जेणेकरून पंकजा मुंडे यांना पुन्हा विधानसभेवर निवडून आणता येईल. त्यासाठी पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या पाठोपाठ गंगाखेड मतदारसंघातील रासपचे रत्नाकर गुट्टे यांनीही पंकजा मुंडे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन जागा सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे.परळीतून पंकजा यांना निवडून आणण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी पंकजा यांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या होत्या. मात्र, धनंजय मुंडे यांनी पंकजांचा ३० हजारांपेक्षाही अधिकच्या मताधिक्य़ाने पराभव केला होता. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पंकजा यांचा पराभव झाल्याने भाजपची अनेक राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाथर्डी आणि गंगखेडपैकी एका मतदारसंघात पोटनिवडणूक घेऊन पंकजा यांना पुन्हा विधानसभेवर पाठवावे. जेणेकरून मंत्रिमंडळात त्यांना सहभागी करून घेता येईल, असा प्रस्ताव पंकजा यांच्या समर्थकांकडून मांडण्यात आला आहे. त्यासाठी भाजप नेते भीमराव धोंडे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. ओबीसी समाजाचे प्राबल्य असणाऱ्या अनेक मतदारसंघात पंकजा यांच्यामुळे भाजपला विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पंकजा यांना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर सर्वस्तरातून विचार झाला तर पंकजा मुंडे यांना सोइचा मतदारसंघ हा गंगाखेड मतदार संघाचं असू शकतो. रत्नाकर गुट्टे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना सपोर्ट करण्याची हमी दिली आहे त्यामुळे गंगाखेड मतदारसंघातून पंकजा मुंडे उभा टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही
टिप्पण्या