मुख्य सामग्रीवर वगळा

मॅक्स महाराष्ट्र आणि रवींद्र आंबेकर यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात

एखाद्या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पीक घ्यावं, मशागत करावी, पोटच्या पोरासारखं पिकाला संभाळावं आणि एक दिवस भयानक उन्हात ते करपून जावं, तुफानी पावसानं उभ्या पिकाचा चिखल व्हावा तेव्हा त्या शेतकऱ्याला जे वाटेल तेच सध्या आम्हाला वाटतंय. अशाप्रकारच्या बातम्या अनेक केल्यायत पण आज पहिल्यांदा ती भावना जगतोय.

साधारण तीन-साडेतीन वर्षांपूर्वी मॅक्स महाराष्ट्र रिसर्च ग्रुप फॉर्म झाला. त्यानंतर जानेवारी २०१७ ला ब्लॉग स्वरूपात वेबसाईट आणली. पुण्यातून वेबसाईट चालवली. हळूहळू व्हिडीओवर काम करायला लागलो. जेवढं येत होतं तेवढं तोडकंमोडकं एडिटिंग करून युट्युबवर व्हिडीओ अपलोड करायचो. तेव्हा युट्यूबवर एक हजार व्ह्यूज जरी झाले तरी भारी वाटायचं. काहीतरी वेगळं करतोय याचा आनंद होता. तेव्हा अगदीच शून्यापासून सुरू झालेलं चॅनेल आज पावणेतीन लाख सब्स्क्रायबर्सपर्यंत आलं होतं.

हा प्रश्न फक्त एका युट्युबचॅनेलचा नाहीय. या काळात अनेक संकटं आली. ती सगळ्याप्रकारची होती. पण त्याची झळ रवी सरांनी आमच्यापर्यंत कधी येऊ दिली नाही. काय होतंय, काय घडतंय याची आम्हालाही कल्पना होती. पण हे सगळं त्यांना आम्हाला कळू द्यायचं नव्हतं आणि आम्हीही सगळं कळूनही काहीच माहीत नाही असा आव आणत राहिलो.

हे सगळं करत असताना भविष्य काय असणार आहे हे माहीत नव्हतं. पण हे निश्चित होतं की जे असेल ते जबरदस्त असणारंय. बॉस म्हणून किंवा टीम लीडर म्हणून रवी सरांचं व्हिजन कायम क्लियर राहिलेलंय. त्यांनी हे सगळं आपल्या जिद्दीनं आणि विचारांनी उभं केलंय. मी आणि माझ्यासारखी अनेकजण आज आत्मविश्वासाने काम करतोय याचं कारण फक्त मॅक्स महाराष्ट्रच आहे. हा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. हे आमच्यासाठी इमोशन आहे. इथं काम करणारा प्रत्येकजण फक्त नोकरी नाही करत. त्याला इथं पत्रकारिता करण्याचं आणि शिकण्याचं समाधान मिळतं. आणखी खूप गोष्टी आहेत. सगळ्याच नाही शेअर करता येणार आणि करूही नाही शकणार.

खरंतर दोन आठवड्यांपूर्वी मॅक्सच्या वेबसाईटला १ हजार दिवस पूर्ण झाले. तेव्हाच हे सगळं लिहायची ईच्छा होती. पण आज यानिमित्ताने लिहायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. ठीक आहे. काही लाखांचं चॅनेल बंद झालं म्हणून वाईट नक्कीच वाटतंय पण त्याने फार खचून जाणार नाही. बरंच काही केलंय, आणखी खूप काही करायचंय. हा प्रवास असाच सुरू राहणारंय!

Ravindra Ambekar

टिप्पण्या