मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रवादीत फूट पडायची नसेल तर भाजपला साथ द्या :अजित पवार यांची मागणी

मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे 3 दिग्गज नेते त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. अजित पवार यांची परत घरवापसी करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवार हे थांबलेल्या ब्राइटन इमारत इथं गेले. यावेळी सर्व नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आमदारांच्या मार्फत शरद पवारांना एक निरोप पाठवल्याची माहिती आहे.'राष्ट्रवादीत फूट पडून द्यायची नसेल तर पक्षाने भाजपला पाठिंबा द्यावा,' असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी पाठवल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांना यश आलं नसल्याचं दिसत आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातून बंड करत भाजपला पाठिंबा दिला. या पाठिंबाच्या जोरावर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र आता या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. कारण राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे परत राष्ट्रवादीत परतले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित आहेत. त्यामुळे हा अजित पवार आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण या नेत्यांच्या पाठिंब्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

टिप्पण्या