मुख्य सामग्रीवर वगळा

स्मशानभूमी स्वच्छ करुन वाहिली वडीलांना श्रध्दांजली

स्मशानभूमी स्वच्छ करुन वाहिली वडीलांना श्रध्दांजली
मुंबई : सावदा जि. जळगाव येथील स्वातंत्र्य सेनानी शंकरअप्पा महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या तीन मुलांनी व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने स्मशानभूमीची स्वच्छता करुन अनोखी श्रध्दांजली अर्पण केली. मंत्रालयातील अधिकारी डॉ.अनिल महाजन यांचे ते वडील होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. वडीलांच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता, किंवा १३ वे १४ वे असे विधी न करता अनिल महाजन आणि परिवाराने पाचव्या दिवशी स्मशानभूमीतील कचरा गोळा केला. बसण्यासाठीच्या पायऱ्यां स्वच्छ केल्या. भिंतीवर आणि सर्वत्र साचलेली राख साफ केली. स्मशानभूमीचा अंत्यविधीचे मंडप गृह झाडून चकाचक केले. या कामात त्यांच्यासोबत एच.के. पाटील, विजय महाजन, दिलीप महाजन, डॉ. अमित महाजन, डॉ. तुषार पाटील, एच.के. पाटील, अ‍ॅड. राकेश पाटील, पंकज कुरकुरे आदी सहभागी झाले होते. या अनोख्या कामाचे पंचक्रोशीत कौतुक होत होते. शंकरअप्पा महाजन यांनी जीवनाची सुरुवात तलाठी म्हणून केली. पुढे महसूल विभागाशी त्यांचा संबंध आला. अत्यंत तंदुरुस्त तब्येत हा अवघ्या पंचक्रोशीत कायम उत्सूकतेचा विषय होता. दुबार काष्टा, चोपून नेसलेले धोतर, पांढरा पूर्ण बाह्यांचा अंगरखा, डोक्यावर पांढरी टोपी आणि पाठीचा ताठ कणा ही त्यांची शेवटपर्यंत ओळख कायम राहीली. सावदा येथे त्यांनी हनुमान मंदीर, शिवदत्त व शनी मंदिराचे बांधकाम केले होते. रावेरचे उपनिरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरीक्षक राहूल वाघ आणि पोलिस सहकाऱ्यांनी या स्वातंत्र्यसैनिकास यावेळी मानवंदनाही दिली. अनिष्ठ रुढींना दूर सारुन स्मशानभूमी स्वच्छता करुन अनिल महाजन पुन्हा मुंबईत कार्यालयात रुजूही झाले.

टिप्पण्या