मुख्य सामग्रीवर वगळा

आपुलकीने वागणारा जगातील एकमेव राजा..छत्रपती शिवाजी महाराज (संजय रायबोले यांचा विशेष लेख)

आपुलकीने वागणारा जगातील एकमेव राजा..छत्रपती शिवाजी महाराज
      जगाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले.परंतू लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सन्माननीय आणि प्रेरणादायी कायमच आहे. परंपरेने राजा होता येते हे ठाऊक असलेल्या लोकांच्या मनात स्वराज्याची संकल्पना कोणताच राजा रुजवू शकला नाही.
 म्हणुनच शिवरायांचा इतिहास अद्धितीय असा आहे. त्या काळात मोगलशाही व अदिलशाही विरुद्ध संघर्ष करून मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्यासाठी हसत हसत मरायला तयार होणारे शुरवीर सैनिक फक्त शिवरायांच्या सैन्यात होते.कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यातील प्रत्येक सैनिकांना आपुलकीने वागवीत, जातीभेद नष्ट करून सर्व स्तरातील मावळे त्यांनी स्वराज्याच्या कामी जोडले होते. वर्णभेदाने ठरविलेल्या खालच्या जातीतील अस्पृश्य ,बारा बलुतेदार, आलुतेदार अशा आठरा पगड जातीच्या  माणसाला दुर न ठेवता हातात तलवारी देऊन खांद्याला खांदा लाऊन वागविणारा राजा म्हणुन त्यांची बहुजन समाजाला आजही ओळख आहे. शिवरायांचा महत्त्वाचा गुण म्हणजे कमालीचा साधेपणा होय. सैन्याबरोबर राहून त्यांनी सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगाना आनंदाने तोड दिले.
संपूर्ण जगातील सेनानायकाच्या क्रमांकात शिवाजी महाराजांचे स्थान प्रथम दर्जाचे आहे.
महाराजांच्या लढाया केवळ मुस्लमानांशीच झाल्या असे नाही तर आप्त स्वकीयांसह शहाजादे, इराणी व पठाण सरदार तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायापुढे हात टेकले होते. जलमार्गापासुनही स्वराजाला धोका होऊ शकतो हे ओळखण्याची दुरदृष्टी होती म्हणुन सातासमुद्रापलिकडे जाणे म्हणजे धर्माचे उलंघन करणे असे धर्मशास्त्र सांगत असताना देखील  समुद्रात किल्ले बांधुन त्याच्या रक्षणासाठी स्वतंत्र आरमार उभारणारा एकमेव राजा शिवराय होता. त्यांच्या अंगी असलेले वैयक्तिक शौर्य, कुशल संघटक व सेना नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते.
शिवरायांनी जाती धर्माच्या नावाने भेदाभेद केल्याचे आढळुन येत नाही उलट त्यांनी समानतेचे तत्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना समाविष्ठ करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य महाराजांनी निर्माण केले. ही मोठी गोष्ट याठिकाणी नमूद कराविशी वाटते. शेकडो सेना धूरंधरांना शिवरायांनी प्रशिक्षित केल्यामुळे राजांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मराठ्यांचे स्वातंत्र्य  या लोकांनी जगाच्या पाठीवरील सर्व बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून सुरक्षित ठेवले हे वैशिष्ट्य आहे.
आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते.शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी, आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असे. शहाजी राजाची सुटका, मोऱ्यांचे उच्चाटन, अफजलखानाचा पराभव, स्वतःची पन्हाळ्याहून सुटका, विशाल गडावरच्या चकवा, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या तरी देखील त्यांनी जिद्दीने आणि अनंत अडचणींना तोंड देत मराठ्यांचे साम्राज्य विस्तार केला. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रुपात पाहत होती. सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगातील शिवरायांचा राज्य विस्तार उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पसरला होता.
महसुलाची पद्धत बदलुन शेतकरी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेतले. उभ्या पिकातुन सैनिकांनी घोडदळ नेऊन शेतीचे नुकसान करू नये असे आदेश दिले. महिलांना संरक्षण व सन्मान देण्यात आला. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाचे राज्य ऊभारणारा राजा म्हणुन त्यांची ओळख आहे. प्रजेचे सुखदुःख जाणुन प्रसंगी प्रतापराव गुज्जर सारख्या सैनिकांच्या वीर मरणानंतर त्यांच्या उपवर मुलीला स्वताची सुन बनविणारा राजा सैनिकांना आपला वाटु लागला. म्हणुनच त्यांना शिवबा, शिवराय,शिवाजीराजे असे आपुलकीने बोलले जाते. तानाजी मालुसरे सारख्या सरदाराच्या निधनानंतर त्यांच्या मुलाचे लग्न समारंभ पार पाडायला स्वता हजर होते. एवढेच नाही तर एका ही किल्ल्याला  देवादिकांची नावे दिली नाहीत तानाजीच्या सन्मानार्थ कोंढाणा किल्याचे नाव बदलून सिंहगड असे नाव ठेवले. त्यांनी कधीच अंधश्रद्धा जोपासली नाही आमावस्येला लढाईसाठी मुहूर्त काढायचे. त्यांनी वतनदारी,जमीनदारी पद्धती नष्ट करून सैनिकांना पगारी सैनिक ठेवल्याने सैनिकांना लढण्यास बळ आले. घरच्या कुटुंबियांना पोटभर अन्न मिळत असल्याने निश्चिंतपणे  सैनिकांनी प्राणाची पर्वा न करता शिवरायांचा मावळा बनुन खंबीरपणे साथ दिली.विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. केवळ सत्ता आणि जग जिंकायची हाव असलेल्या जगातील राजे महाराजांची आठवण किंवा जयंती, पुण्यतिथि साजरी होताना कुठेही दिसत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यशैलीची आठवण क्षणोक्षणाला आल्यावाचुन राहत नाही. १९ फेब्रुवारी म्हणजे बहुजनांचा सण असल्याचे दिसून येते. त्यांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता.  शिवाजीराजे गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज देत असत. सर्व धर्मांना समान लेखले, रायगडावर मशीद बांधुन मुसलिम बांधवांना उपासनेची मोकळीक दिली.संबंध रयतेची काळजी घेतली. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते लोक कल्याणकारी वंदनीय थोर पुरुष होते. अशा महान विभुतीला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!
लेखन/संकलन
संजय साधुजी रायबोले
मोबाईल क्रमांक 8888000676
(राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ८मुंबई)

टिप्पण्या