रात्री झोपणारा कायमचाच झोपेन आणि जागणारा जिवंत राहील" - कोरोना व्हायरससंबंधीच्या या अफवेमुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात माणसं रात्री जागून काढत आहे.
चार दिवसांपूर्वी मी आईला फोन केला तर ती शेतात होती. सरकार घरीच थांबा असं सांगताना असतानादेखील तू शेतात काय करतेय, असं विचारल्यावर ती म्हणाली, "करोनाची बिमारी आली आहे. शेतात आल्यावर करोना होत नाही, म्हणून मग मी दादाच्या लेकरांना घेऊन शेतात आले आहे."
आईचं उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटलं. ज्या कोरोनाची जगभरात चर्चा सुरू आहे, ज्यामुळे अनेकांचा जीव जात आहेत, त्या कोरोनाविषयी गावाकडे काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं की, ग्रामीण भागात एकीकडे कोरोनाबाबत प्रचंड भीतीचं वातावरण आहेच, तर दुसरीकडे अजूनही लोक निर्धास्तही आहेत.
अफवांचं पेव आणि भीती
आज रात्री झोपणारा झोपेन आणि जागणारा जागेन, कोरोना व्हायरसंबंधीची ही अफवा राज्यातल्या एका गावातून दुसऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरत आहे. या अफवेमुळे राज्यातल्या लातूर, नांदेड, बीड, परभणी, बुलडाणा, अहमदनगर या जिल्ह्यांतील गावांमधील माणसं अख्खी रात्र जागून काढत आहे.मंगळवारी ही अफवा अहमदनगरमधल्या तांबे वस्तीत पसरली आणि अख्ख्या वस्तीतली माणसं रात्रभर झोपली नाही.
तांबे वस्तीतल्या आदिनाथ गाढेनं याविषयी आम्हाला सांगितलं की, "कुण्यातरी एका बाईची डिलिव्हरी झाली आणि जन्माला आल्याआल्या मुलीनं म्हटलं, 'आज रात्री जो झोपेल, तो कायमचाच झोपेल आणि जो जागी राहील, तो जिवंत राहील. अशी अफवा आमच्या वस्तीत पसरली. त्यामुळे मग वस्तीतील सगळे जण एकत्र जमले आणि रात्रभर गप्पा करत बसले. कुणीच झोपलं नाही."
हीच अफवा बुधवारी रात्री परभणी जिल्ह्यातल्या पालममधील शनिवार बाजारात ऐकायला मिळाली आणि आणि इथल्या अख्ख्या परिसरानं बुधवारची रात्र जागून काढली.
या परिसरातील देवानंद हत्तीअंबीरेनं बीबीसीला सांगितलं, "बुधवारी रात्री 3 वाजता गल्लीतल्या एका माणसाला नातवाईकाचा फोन आला की, कोणत्या तरी गावात एक लहान मूल जन्माला आलं आणि म्हणालं, कोरोना व्हायरस आला आहे. आज रात्री झोपणारा कायमचाच झोपेन आणि जागणारा जिवंत राहील. फोनवर हे ऐकल्यानंतर या माणसानं गल्लीतल्या सगळ्यांना उठवलं आणि झोपू नका म्हणून सांगितलं. यामुळे आमच्या परिसरातील माणसं बुधवारी रात्रभर जागी होती."
बुधवारच्या रात्री ही अफवा माझ्याही गावात (सिनगाव जहांगीर, जि. बुलडाणा) पसरली आणि गावातल्या झोपडपट्टीतली माणसं रात्रभर झोपली नाही.
ग्रामीण भागात या आणि अशा अनेक अफवांमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
ग्रामीण भागातील या काही अफवा ज्या सर्रास कुणाच्याही तोंडून ऐकायला मिळतात -
- बाईला जितके लेकरं, तितके दिवे तिनं देवासमोर लावले तर कोरोना होत नाही.
- कोरोनापासून ज्यांना बरं वाटलं नाही, त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाकलं जात आहे.
- सरकारने अजून करोनाग्रस्तांचा खरा आकडा सांगितला नाही. आपल्यापासून तो लपवला जात आहे.
- कोरोना आलाय, आता लवकरच या जगाचा अंत होणार आहे.
- सरकार लवकरच विमानातून औषध फवारणी करणार आहे.
- कोरोनाचा विषाणू जमिनीवरून चालतो.
- गावाकडे कोरोना येत नाही'ग्रामीण भागात एका बाजूला अशापद्धतीचं भीतीमय वातावरण असलं, तरी दुसरीकडे मात्र एक प्रकारचा निर्धास्तपणा जाणवतो.गावात अजूनही मुलं एकत्र येऊन क्रिकेट खेळतात, कॅरम खेळतात, शेतात गहू आणि हरभऱ्याची मळणी सुरू आहे. कोरोनाविषयी पाहिजे तितकं गांभीर्य अजून ग्रामीण भागात जाणवत नसल्याची खंत आदिनाथ बोलून दाखवतो.औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातली उपळी गावात राहणाऱ्या विकास शेजूळचाही अनुभव असाच आहे."गावाकडे कोरोनाला पाहिजे तितका गांभीर्यानं घेतलं जात नाही. दररोज सकाळी गावातली तरुण मंडळी टोळक्यानं गप्पा मारताना दिसून येते. दुपारी पत्ते खेळताना दिसून येते. गावाकडे कोरोना येत नाही, आमचा बातम्यांवर विश्वास नाही, असं ते म्हणतात. याशिवाय कुरडया, पापडं, शेवया बनवण्यासाठी महिला एकत्र जमत आहेत," विकास सांगतो.
- अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल – आरोग्य राज्यमंत्रीग्रामीण भागातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला.ग्रामीण भागातील अफवांविषयी विचारल्यावर यड्रावकर यांनी सांगितलं, "कुणीही अफवांवर विश्वास ठेऊन घाबरून जायचं काम नाही. जिथं जिथं बोगस अफवा पसरवल्या जात आहेत, तिथं तिथं व्हॉट्सअपच्या ग्रुप अॅडमिनवर कारवाई सुरू केली आहे. त्यांच्यावर गुन्हेसुद्धा नोंदवण्यात आले आहेत."आजही ग्रामीण भागात काही जण कोरोनाविषयी गंभीर नसल्याचं जाणवतं, यावर यड्रावकर यांनी म्हटलं, "आवश्यक नसताना कुणीही गावात फेरफटका मारू नये. आपल्या जीवाची काळजी आपण घेतली तरच यातून मार्ग काढू शकतो. 'मीच माझा रक्षक' ही मोहीम सरकारनं यासाठीच सुरू केली आहे. प्रत्येकानं घरात थांबून सरकारला सहकार्य करावं."
टिप्पण्या