आपल्या भारत देशाच्या पावन भुमीवर अनेक महापुरूषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे.त्यांच्या सेवेचा वारसा आजही आपल्याला प्रेरणादायक ठरला आहे. या थोर समाजसुधारकांमध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष स्थान असुन त्यांचे स्मरण म्हणुन त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात देश विदेशात साजरी केली जाते. नव्हे तर त्यांच्या जयंतीला ऊत्सवाचे स्वरूप आले आहे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
मुख्य म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यात असतानाच त्यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली अन सार्वत्रिक जयंतीची सुरूवात झाली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते.आज केवळ भारतातच नव्हे तर देश विदेशात देखील त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते ही आनंदाची बाब आहे. यावर्षी कोरोना वायरस अर्थात कोव्हीड-19 या सारख्या साथीच्या रोगाच्या सावटाखाली संपुर्ण जग सापडले असल्यामुळे आणि त्या रोगावर उपचार ही उपलब्ध नसल्याने भारतासह अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सगळीकडे लाॅकडाऊनची स्थिती आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी न करता घरातच आपल्या कुटुंबासह ऑनलाईन पदधतीने संपुर्ण देशात जयंती साजरी करण्यात येत आहे.
बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक किंवा आंबेडकरवादी होण्यासाठी विशिष्ट जातीची, धर्माची बंधने घातलेली नाहीत. आंबेडकरांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे वागणारा हा आंबेडकरवादी म्हणुन ओळखला जातो. मग तो कुठल्याही देशाचा ,धर्माचा,जातीचा,पंथाचा असला तरी चालेल. मुळात डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व इतके उत्तुंग होते की, कुणीही त्यांना मर्यादित करण्याचा प्रयत्न करूच शकत नाही.म्हणुन बाबासाहेबांना स्वत:च्या जाती पुरते किंवा बौद्ध धर्मापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. डॉ. बाबासाहेबांची भूमिका सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची होती.
डॉ.बाबासाहेबांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिल्यानंतर ७० वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर का होईना त्यांच्या राष्ट्रीय विचारांना महत्त्व येत आहे. त्यांच्या विचारामुळे आंबेडकरवाद ही या देशातील सर्व शोषित, पीडित,अल्पसंख्याक आणि वंचितांची ‘राष्ट्रभाषा’ बनत आहे. डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हाच खरा राष्ट्रवाद आहे, हे सत्य भारतीयांना समजत आहे. अजुनही या पासून जे दूर आहेत, त्यांना हे सत्य समजेल त्या दिवशी भारतात खऱ्या अर्थाने न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्वाचे राज्य आल्याशिवाय राहाणार नाही.
कधीकाळी केवळ आंबेडकरी जनतेकडून साजरी केली जाणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज सर्वस्तरातून साजरी होते आहे. हे त्याचेच उदाहरण आहे.
मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. प्रारंभीच्या काळात केवळ दलितांचे कैवारी म्हणून करून दिलेली डॉ. आंबेडकरांची ओळख आज भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून नव्या पिढीला होताना दिसत आहे.
सदयस्थितीला आपल्या देशातील वातावरण अत्यंत गढूळ आहे. कधी काळी लोकशाहीला विरोध करणाऱ्यांनी लोकशाहीचा आधार घेऊन आपल्या विचाराचा एकछत्री अंमल सुरू करण्याचे स्वप्न काही प्रमाणात सत्यात ही उतरविले आहे. त्याला कारण इथल्या लोकांची अपरिपक्व मानसिकता आहे. हिंदूंच्या देवभोळेपाणाचा फायदा घेऊन एका विचारधारेने देशाला हिंदुत्ववादी देश बनविण्यासाठी चालवलेले कुटील कारस्थान एकसंघ भारताच्या अस्तित्वाला सुरूंग लावणारे आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारलेल्या देशाला कुठल्यातरी धर्माचे राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करणे हे राष्ट्रविघातक आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशात सुरू असलेली अल्पसंख्याकांची चळवळ संविधान व बाबासाहेबांचे विचार घेऊन वाटचाल करीत आहेत. हैद्राबाद येथील रोहित वेम्युला प्रकरण असो की दिल्लीचे जेएनयु प्रकरण सगळीकडेच आता संविधानाच्या रक्षणाची भाषा बोलली जाते आहे.
देशात सर्वत्र काॅग्रेस पक्ष सत्तेत असल्याने आजवर बाबासाहेबांपेक्षा गांधीजींना जास्त राजाश्रय मिळाला होता.दिवसेंदिवस लोकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे सर्वांना बाबासाहेबांचे विचार हळुहळु कळायला लागलेत त्यामुळे एकेकाळी "एक रूपया चांदीका देश हमारा गांधीका" म्हणणारया लोकांना गांधीजी पेक्षा बाबासाहेब आपले वाटु लागले आहेत. विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार, सिंबाल आॅफ नाॅलेज,राष्ट्रनिर्माते म्हणुन आता बाबासाहेब सगळ्यांनाच कळायला लागले आहेत. कुठलेही अंदोलन असो चळवळी असो प्रेरणास्थान म्हणुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हेच पाहायला मिळत आहेत.
देशाच्या दृष्टीने ही गौरवाची बाब असली तरी या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पद्धतशीरपणे बगल देऊन निव्वळ प्रतिमा पूजन,पुतळे,स्मारकं बनविण्याचा घाट घातला असल्याचे दिसून येत आहे.
डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेली ठिकाणं स्मारके बनवून त्याला पंचतीर्थ म्हटले जात आहेत. दीक्षाभूमी व चैत्यभूमीला सरकार पक्षाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. हे डॉ. बाबासाहेबांचे दैवतीकरण करण्याचा प्रकार आहे. नेमकं हेच आपल्याला उमजत नाही...? बाबासाहेबांचे अनुयायांनी म्हणविणारे देखील कांही प्रमाणात बाबासाहेबांना देव मानून त्यांची पूजा अर्चा करताना दिसत आहेत. भीम जयंतीनिमित्त आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण होण्याऐवजी विद्रुपीकरण चालवले आहे.निळा फेटा घातलेले बाबासाहेब...भडक निळा टिळा लावलेले बाबासाहेबांचे फोटो लावुन डिजेच्या तालावर नाचणारी पिढी नाचुन आनंद घेत आहेत. आठरा-आठरा तास अभ्यास करणारे आंबेडकर,ज्यावेळी देशात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या अशा परिस्थितीत परदेशात जाऊन सुमारे बत्तिस पदव्या मिळविणारे आंबेडकर,.. अर्थशास्त्र,कायदा,तत्वज्ञान,पत्रकारीता,ईतिहास,राज्यशास्त्र,समाजशास्त्रात पारंगत असलेल्या व्यक्तिमत्वाचे स्मरण करताना याचं भान ठेवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला डॉ. आंबेडकरांच्या शिकवणुकीनुसार प्रत्येकाने वागण्याची गरज आहे. स्वताला आंबेडकरवादी म्हणवुन घेताना केवळ भक्त होण्यापेक्षा त्यांचे अनुयायी बनण्याची गरज आहे. जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून भारतीय संविधानाच्या व बाबासाहेबांच्या विषयांवर विविध स्पर्धांचे आयोजन,व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करणे,मुंबईत चैत्यभुमीवर अभिवादन करण्यासाठी मेनबती, फुलांचा खर्च टाळुन काही सामाजिक संघटनेने राबविलेल्या एक वही एक पेन अभियानाप्रमाणे तसेच आंबेडकरवादी मिशन कडुन आंबेडकर जयंतीला राबविण्यात येणारे आठरा तास अभ्यासाचे उपक्रम असे विविध उपक्रम गावागावात मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज आहे. कारण आजच्या घडीला आपल्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
शिक्षणासाठी आता आपल्याला मुबलक प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत. पदवीत्तर व्यावसायीक शिक्षणासाठी मागासवर्गीयांना देखील फी भरावी लागत आहे . भारत सरकारची शिष्यवृती अनेक वर्षापासून वाढलेली नाही.सद्य परिस्थितीत मिळणारया शिष्यवृतीत विद्यार्थ्यांचा एक महिण्याचा देखील खर्च भागत नाही अशी अवस्था झाली आहे. मॅनेजमेंट कोटा पदधतीने श्रीमंताना मनाजोगे शिक्षण विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर गरिबीमुळे मागासवर्गीय समुहाला चांगले शिक्षण देखील मिळत नाही.परिक्षांचे स्वरूप बदलले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळवून देखील त्याच्या जातीमुळे राखीव प्रवर्गात भरती केले जाते आहे. एवढेच नव्हे तर मोठ्या पदांवर सरकार थेट नियुक्त्या करीत आहे. हा एक प्रकारे अन्यायच आहे.
बलुतेदारांचे व्यवसाय बंद पडल्याने गावात हाताला काम नाही. सुशिक्षितांना रोजगाराच्या संधी नाहीत. कंत्राटी पदधतीने पुरता घात केला आहे. जो मागासवर्गीय समाज कांही प्रमाणात नोकरयामध्ये असला तरी त्यांना पदोन्नतिची संधी मिळत नाही. पदोन्नतीची संधी नसल्यामुळे त्यांना खालच्या पदांवरच काम करावे लागते.व्यवसायात देखील ऑनलाईन व्यापार , जीएसटी यामुळे कमी भांडवलात धंदा यशस्वी होऊ शकत नाही. गरिब अधिकच गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत त्यामुळे वर्गीय पद्धतीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. तर दुसरीकडे जाती, धर्माच्या नावाखाली देशांत अराजकता माजवली जात आहे. खैरलांजी सारखे अत्याचार आता नवे स्वरूप घेऊन पायल तडवीच्या रूपाने पहायला मिळत आहेत.महिलांच्या बाबतीत विचार केला तर केवळ दलित स्त्रियांनीच बाबासाहेबांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. बाबासाहेबांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर मांडले आहेत. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.
कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.
आंबेडकरांच्या विचारांवर आधारित शेती, सार्वजनिक उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, नदी जोड प्रकल्प, लोकसंख्या नियंत्रण, अर्थ आणि शिक्षण, सामाजिक समता आदी कार्यक्रम सरकार तयार करू शकते. परंतु डॉ.बाबासाहेबांवर बेगडी प्रेम असल्याने सरकार त्यांच्याशी संबंधित स्मारकांचे पंचतीर्थ उभारून आंबेडकरी जनतेची सहानुभूती मिळवून त्याचे रुपांतर मतपेढीत करण्याचा प्रयत्न करीत आहे
सत्ताधारी पक्ष तर त्यांना देव्हाऱ्यात बसवून आंबेडकरी जनतेच्या देवभोळेपणाचा फायदा घेत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी स्मारके बनवून त्याला पंचतीर्थ म्हटले जात आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीला वैज्ञानिक ज्ञानभूमी व मुंबई येथील चैत्यभूमीला स्फूर्तीस्थानाचे महत्त्व देण्याऐवजी सरकार पक्षाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. हे डॉ. बाबासाहेबांचे दैवतीकरण करण्याचा प्रकार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला डॉ. बाबासाहेबांचे भक्त असल्याचे घोषित केले आहे. त्यांनी खरोखरच डॉ. बाबासाहेबांचे तत्वज्ञान वाचले असते तर त्यांनी स्वत:चा उल्लेख भक्त म्हणून केलाच नसता. कारण बाबासाहेबांनी त्यांना भक्तांची नव्हे तर, अनुयायांची गरज असल्याचे प्रतिपादन वेळोवेळी केले होते पण संघाच्या भक्ती संप्रदायात वाढलेल्या मोदींना हे कळले तर नवलच. बाबासाहेबांच्या अनुयायांनीसुद्धा बाबासाहेबांना देव मानून त्यांची पूजा अर्चा सुरू केली आहे. बुद्धाबरोबर त्यांच्या प्रतिमेची, पुतळ्याची पुजाही पुष्प, धूप आणि दीपाने केली जात आहे. बाबासाहेबांना विभूतीपूजा किंवा व्यक्तीपूजा कधीही मान्य नव्हती. जीवंतपणी त्यांच्या पाया पडणारांनाही ते चांगलेच निरुत्तर करित असत. त्यामुळे आंबेडकरी समाजाने त्यांचे दैवतीकरण थांबवून त्यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार वागण्याची गरज आहे.
ओबीसी,दलित, बौद्धांना व मुस्लिमांना राजकीय पटलावर कुठलेही स्थान नाही. त्यामुळे संविधान विरोधी कृत्यांना,अन्यायाला वाचा फोडणारांना आता नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. क्षुल्लक कारणांवरून देखील देशद्रोही ठरविण्याचा परवानाच जणु काही लोकांना मिळाला आहे असे चित्र देशात पहायला मिळत आहे. सार्वजनिकपणे संविधान जाळणारे ,बॉम्बस्फोट घडविणारे संघाचे प्रशिक्षित तरूण धार्मिक अस्मितेचा अभिमान बाळगत देशविघातक कृत्य करत आहेत.तरी देखील त्यांच्या पाठीशी सत्ताधारी प्रस्थापित मंडळी ऊभी राहतात.उलट शहरी नक्षलवादाच्या नावाखाली आपल्यातील विचारवंतांवर देशद्रोहाचे खटले दाखल करण्यात येत आहेत.
ही आमच्या समुहापुढील आव्हानं आहेत. याकडे ना सरकार ना पुढारी कुणीच लक्ष देत नाहीत. सर्वसामान्यांना तर याचे काहीच देणंघेणं नाही. अशावेळी बाबासाहेबांच्या विचारांनी पेटून उठणारी तरूण पिढी निर्माण होण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील बुद्धीवादी, साहित्यिक, कार्यकर्त्यांनी आपल्या वसाहती आणि आपले लोक सोडून दोन पावले पुढे येण्याची गरज आहे.कारण आंबेडकरी विचारधारेतूनच खऱ्या कल्याणकारी राष्ट्राची निर्मिती होणार आहे.राज्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेबांची विचारधारा प्रामाणिकपणे स्वीकारली तर, देशातील साधन-संपत्तीत सर्व भारतीयांना समान वाटा मिळाल्यावाचुन राहणार नाही. बाबासाहेबांवर खरोखरच उत्कट प्रेम व निष्ठा असेल तर थोडासा विचार करा की फक्त महाराष्ट्र राज्यात एप्रिल महिन्यात जयंतीनिमित्त कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.गुलाल,निळा उधळून डिजेच्या तालावर नाचुन बाबासाहेबांचा विजय असो म्हटल्यावर यामधील एक रूपया देखील बाबासाहेबांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळत नाही. आपल्याला बाबासाहेबांनी तुमच्या कमाईचा विसावा हिस्सा हा समाजकार्यात खर्च करण्यासाठी सांगितले होते. मग नुसताच अर्थशास्त्रज्ञ म्हणुन बाबासाहेबांचा उदोउदो करण्यापेक्षा प्रत्येकाने जर शंभर रुपये आंबेडकरांच्या कुटुंबियांना दिले तर धम्म चळवळीला शासनाकडून मदत मागण्याची गरज पडणार नाही. यावर्षी जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेतला असला तरी जमा झालेल्या वर्गणीतुन सार्वजनिक वाचनालये ऊभी करावीत व शिल्लक रक्कम आंबेडकरांच्या कुटुंबियांना द्यावी. तरच खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल.
लेखन/संकलन
संजय साधुजी रायबोले
(एम.जे.&एम.एस)
मोबाईल क्रमांक 8888000676
टिप्पण्या