मुख्य सामग्रीवर वगळा

अँकर,वेश्याव्यवसाय, पत्रकार अटक आणि प्रश्नचिन्ह ???

एबीपी माझाच्या पत्रकाराला इकडे अटक करण्यात आली आणि तिकडे रुबिका लियाकत सरळ झाली, अशा स्वरूपाच्या पोस्ट बघून गम्मत वाटली. पत्रकाराला अटक होणे योग्य नाही, अशा प्रकारची नाराजीही मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली. ती सुद्धा गम्मतच आहे. त्यामागे एक प्रकारचा भाबडेपणा आहे. पत्रकाराला अटक होऊ नये, म्हणजे नेमके काय ? मग शिक्षकाला झाली तर चालेल का? डॉक्टरला झाली तर चालेल काय़ लेखकाला झाली तर चालेल का ? शेतकरी, मजूर आणि गरीब यांना तर केव्हाही झाली तरी चालेल, फक्त पत्रकारांना व्हायला नको, असे म्हणायचे आहे का ?
मुळात आपण सर्वात आधी या समाजाचा घटक आहोत, देशाचे नागरिक आहोत आणि त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या व्यावसायिक भूमिका येतात. त्यामुळे या देशातले सारे कायदे सर्वसामान्य परिस्थितीत सर्वांना सारखेच लागू होतात. व्हायलाच पाहिजेत. मग अमक्याला अटक होणे योग्य नाही, असा विषय कसा काय निर्माण होऊ शकतो ?
खरं तर ती व्यक्ती कोण आहे, त्यापेक्षा त्या अटकेमागील कारण काय आहे? ते योग्य आहे का? परिस्थिती तशी आहे का आणि अटक करणारी एजन्सी प्रामाणिक आहे का? ह्या गोष्टींची खातरजमा करूनच आपण प्रतिक्रिया द्यायला हवी. पण कुलकर्णी प्रकरणात तसे होतांना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर वरील घटनेचा विचार केला तर मी सर्वात आधी विचार करीन, की… भाजपची इतर सरकारं जशी सूडबुद्धीने वागतात, कायदा गुंडाळून ठेवतात, खोटे दावे करतात, वाटेल तसे व्हिडियो तयार करून प्रसारित करणाराला संरक्षण देतात, तशाच प्रकारे.. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचाही हेतू किंवा इतिहास आहे का ? तर असे म्हणायला मुळीच आधार नाही. हे सरकार त्यांच्या सारखे खुनशी आणि पक्षपाती असूच शकत नाही, याबद्दल आजतरी माझ्या मनात कसलाही संभ्रम नाही. पुढेही तसे होण्याची शक्यता दिसत नाही. पण समजा तसे झालेच, तर त्याचा तेवढाच विरोध करायला मला काहीही अडचण जाणार नाही !म्हणजे, जर मला सरकारच्या हेतूबद्दल संशय नसेल, तर पुढचा प्रश्न असा की.. त्या मीडिया हाऊसचा लौकिक, त्यांचा बातम्या देण्याचा मागचा इतिहास मी तपासून पाहीन.
याच न्यायाने जेव्हा मी एबीपी माझाचा २०१४ पासूनचा इतिहास बघतो, तेव्हा तो केवळ एखाद्या पत्रकाराला अटक करण्या पुरताच नव्हे, तर त्यांचे प्रमुख जे कुणी असतील त्यांच्यावरही रासूका सारखा कठोर कायदा लावून चॅनल त्वरित बंद करायला हवे, या तोडीचा आहे. एवढी नीच बातमीबाजी या लोकांनी वेळोवेळी केलेली आहे. एखादा गुंड बेभान झालाच. तर तो फार तर एका वेळी ५/१० लोकांचा जीव घेईल. पण हे मीडिया वाले ठराविक लोक गेली सहा वर्षे सतत एका विशिष्ट समुहाबद्दल द्वेष पसरविण्याचे काम निर्लज्ज पणे करत आहेत.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे जोडे चाटण्यात धन्यता मानत आहेत. ( अर्थात.. हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही निवडक चॅनल सोडले तर बाकीचे चॅनल दिवसा ढवळ्या नागडे नाचताना दिसतात. त्यातले विशिष्ट पुरुष पत्रकार / अँकर जेवढे नीचपणा करतांना दिसतात, त्यांच्यापेक्षाही काही महिला पत्रकार दोन पावलं पुढेच असलेल्या दिसतात. सारी लाज, लज्जा, नीतिमत्ता, माणुसकी या लोकांनी कमरेला गुंडाळली आहे..असो )
ह्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर त्या विशिष्ट बातमी मधील संबंधित पत्रकाराचा सहभाग माझ्या दृष्टीने महत्वाचा असेल. बरेचदा एखाद्या खून खटल्यात वापरलेली गाडी ही दुसऱ्याची असते. ड्रायव्हरचा प्रत्यक्ष खूनाशी काही संबंध नसतो. पण ती गाडी, तिचा ड्रायव्हर महत्त्वाचा दुवा असतो. त्याचा खुनात प्रत्यक्ष सहभाग नसेल तरीही, काही चुका त्याच्याकडून झालेल्या असतात आणि तो प्रत्यक्ष साक्षीदार असतो, म्हणून त्याला अटक करणे अनिवार्य असते. हे आपण लक्षात घेवून नंतरच प्रतिक्रिया द्यायला हव्या होत्या, असे मला वाटते. कुलकर्णी यांनी योग्य सहकार्य पोलिसांना करायला हवं, पोलिसांनी इमानदारीने तपास करणं, सरकारनं तपासात हस्तक्षेप न करणं आणि न्यायालयानं सत्याची चाड ठेवून निकाल देणं, एवढ्या गोष्टी जर बरोबर झाल्यात, तर कुणावरही अन्याय होणार नाही, या बद्दल संशय नको.
पण ह्या वाहिन्या किंवा वृत्तपत्रं आपला धंदा वाढविण्यासाठी काहीही विकायला सदैव तयारच असतात. देशाला आग लागली तरी, यांना त्याची चिंता नाही. उलट ती कशी लागेल, याची कारणं तयार करण्यात आपली बुद्धी वापरतात.
रविश कुमार, पुण्यप्रसून बाजपेयी, अभिसार शर्मा किंवा महाराष्ट्रातील निखिल वागळे, संजय आवटे यांच्यासारख्या पत्रकारांनी सत्याची बाजू घेतली. म्हणून जेव्हा त्यांच्या नोकऱ्या काढून घेतल्या गेल्या, त्यांची – त्यांच्या कुटुंबाची निंदा नालस्ती केली गेली, त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, काही इतर पत्रकारांचे खूनही करण्यात आले, तेव्हा बाकीचा मीडिया किंवा पत्रकार यांच्यापैकी कोण मदतीला धावून गेलेत ?
जे गेले नाहीत ते का गेले नाहीत ? पत्रकारिता धर्माचं पालन करण्याचा मर्दपणा का दाखवला नाही ? आणि जर त्यांनी आपलं कर्तव्य इमानदारीने त्या त्या वेळी पार पाडले नसेल, तर अशा लोकांना पत्रकार म्हणवून घेण्याचा अधिकार कसा काय असू शकतो ? वरील उल्लेख झालेल्या पत्रकारांच्या बाबतीत… जर सरकार कडून अशी कारवाई झाली, तर मात्र सरकारच्या हेतूबद्दल संशय घेण्याला नक्कीच जागा राहील.
तात्पर्य काय, की एखादा शिक्षक शाळेतच दारू पिऊन धिंगाणा घालत असेल, मारपीट करत असेल, तर त्याला अटक करायची नाही का ? केली तर, शिक्षक संघटनांनी त्याची पाठराखण करावी का ? डॉक्टर जर एखादे खोटे प्रमाणपत्र देत असेल, कुणाचा विनयभंग करत असेल तर त्याला अटक करायची नाही का ? केली तर डॉक्टर लोकांनी अटकेचा निषेध करायचा का ? वास्तविक इथे शिक्षक असो की डॉक्टरला झालेली अटक असो, व्यवसायबाह्य कारणाने झालेली आहे. म्हणजेच ती अटक म्हणजे.. डॉक्टर किंवा शिक्षक याला झालेली अटक समजणे हेच मुळात चुकीचं नाही का ?
अलीकडे चॅनलवाले किंवा प्रिंट मीडियावाले टोकाचा नीचपणा करताना दिसतात. ताजे तबलिग प्रकरण घ्या किंवा परवाचे बांद्रा प्रकरण घ्या, ह्यात ते प्रकर्षाने जाणवले. रजत शर्मा ने तर हलकटपणाचा कळस केला. सरळ सरळ मशिदीचा उल्लेख करून त्याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला. असे लोक पत्रकार आहेत की दलाल ? किंवा हे देशद्रोही नाहीत का ?
मीडियावाले आपलं पाप झाकण्यासाठी एखाद्या विषयाच्या समोर चलाखीने प्रश्न चिन्ह टाकून आपला उद्देश साध्य करून घेतात.
उदा. #दलिततरुणनक्षलवादाकडे वळतो आहे का ? असा द्वेषपूर्ण विषय मुद्दाम द्यायचा. समोर फक्त प्रश्नचिन्ह (?) टाकले, की लगेच यांची साऱ्या पापातून सुटका !
अशाच एका महिला अँकरनं आम्हाला चर्चेसाठी बोलावले होते. चर्चा लाईव्ह नव्हती. विषय सांगताना सतीसावित्रीचा आव आणत ती बया म्हणाली की ‘ देखिये.. आप अपने विचार बेझिझक रखिए । खुलकर बोलीये । जैसे की मैं कहूंगी.. की अपने फलां फलां नेता युग पुरुष है । ऐसा नेता पाकर देश को गर्व महसूस होना चाहिए, ऐसा आपको लगता नहीं है क्या ?’ हे ऐकूनच माझं डोकं सटकलं.
मी म्हटलं, असल्या फालतू गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. त्यावर ती म्हणाली, हमे जो चाहिए, वही आप बोलेंगे.. मी आणि आणखी एक दोघांनी पण ठणकावून सांगितलं, ये हमसे नही हो सकता. नंतर वेगळा विषय घेवून चर्चा वगैरे झाली. पण त्या धंद्यासाठी रस्त्यावर #उभी का ? अँकर बाईची चर्चेमध्ये आम्ही जी धुलाई केली, त्यामुळे ती चर्चा बहुधा दाखवली गेलीच नसावी ! असो.
पण या निमित्ताने मीडिया मधल्या अशा महान सुपारीबाज पुरुष आणि महिला अँकर लोकांना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, की जर समजा तुमच्याच स्टाईल ने शेवटी प्रश्न चिन्ह टाकून सोशल मीडियावर खालील विषय कुणी चर्चेला घेतला तर तो तुम्हाला चालू शकेल का.. उदा –
#या या चॅनल ची ही ही अँकर कॉलगर्ल म्हणून सुद्धा व्यवसाय करत असेल का ?
#किंवाहाहाअँकरचमडी_ उद्योगात दलाली करत असेल का ?
प्रश्न आणि भाषा कठोर आहे, यांबद्दल माफ करा. पण समाजद्रोही सत्ताधाऱ्यांना मदत करण्यात कसलीही कसर या विकावू पत्रकारांनी बाकी ठेवली नाही. त्यांच्या ह्या हलकटपणामुळे किती निरपराध जीव गेलेत, किती संसार उध्वस्त झालेत, याची गणती नाही. ही विकृती ठेचायला महाराष्ट्र सरकारनं सुरुवात केली, त्याबद्दल त्याचं अभिनंदनच करायला हवं. कुलकर्णी दोषी आहेत की नाही, हे स्पष्ट होईलच. पण तो एक मोहरा आहे. केवळ त्यांच्यावर कारवाई करून थांबता कामा नये. कटाचे खरे सूत्रधार पकडले गेले पाहिजेत. त्यांना जेलमध्ये टाकायला हवे. त्यांची कृती राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता यासाठी निश्चितच हानिकारक आहे. हे छुपे आतंकवादी आहेत. देशी तालिबान्यांचे हस्तक म्हणून काम करत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेवूनच त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, ही जनतेची मागणी आहे. काळाची गरज आहे ! हे सर्वांनी समजून घ्यायला हवे !
चूक भूल देणे घेणे..

तूर्तास एवढेच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान

टिप्पण्या