मुख्य सामग्रीवर वगळा

गरजू व्यक्तींना अन्नदान करताना सेल्फी किंवा फोटा काढल्यास तुरुंगात जाल

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असणाऱ्या लॉकडाउनदरम्यान अनेक हातावर पोट असणारे कामगार, मजूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. या मजूरांना अन्नदान करण्याचे काम अनेक सेवाभावी संस्था तसेच व्यक्तींच्या माध्यमातून केलं जात आहे. मात्र हे अन्नदान करताना गरजूंबरोबर फोटो काढून ते सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणाऱ्यांचेही प्रमाण खूप आहे. अशाच लोकांविरोधात आता राजस्थान पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आणि सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अनेक फोटो दिसून येत आहे. अडकून पडलेले मजूर, गरीबांना हे लोक अन्नधान्य तसेच जेवणाची पाकिटं वाटताना या फोटोमध्ये दिसून येत आहे. मात्र काही वेळा केवळ फोटो काढण्यासाठी आणि विशिष्ठ उद्देशाने अशा ठिकाणी लोकं जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. म्हणून राजस्थानमधील अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वास मोहन शर्मा यांनी मदतकार्यादरम्यान फोटो काढण्यावर बंदी घातली आहे. गरजू लोकांना अन्नधान्य आणि जेवणाची पाकिटे वाटताना फोटो काढणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अशापद्धतीने फोटो काढणारे लोकं आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचा पालन न केल्याच्या गुन्ह्याखाली कलम १८८ अंतर्गत सहा महिन्यांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात.

टिप्पण्या