मुख्य सामग्रीवर वगळा

धनंजय मुंडे झाले भावूक ….असं काय झालं बीड जिल्ह्यात?

बीड | जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांसह ३३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल काल (दि. ०६) सायंकाळी निगेटिव्ह आले आणि सबंध बीड जिल्ह्याने सुटकेचा निःश्वास टाकला. त्यानंतर सर्व जिल्हा वासीयांच्या प्रार्थना कामी आल्या अशी भावनिक पोस्ट जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुकवरून केली आहे.कोरोनाच्या वैश्विक महामारीपुढे सबंध जग लढत आहे. आरोग्य विभाग, पोलीस आदी कर्मचारी दिवसरात्र धोका पत्करून कर्तव्य निभावत आहेत. त्यांना यावेळी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका निर्माण होतो. बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व अन्य कर्मचारी अशा ३३ जणांचे अहवाल आज चाचणीसाठी पाठवले होते. गेल्या अनेक दिवसंपासून एकही कोरोना रुग्ण नसलेल्या संपूर्ण बीड जिल्ह्याचे या चाचणी अहवालाकडे लक्ष लागुन होते. सायंकाळी ७ च्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याचे घोषित केले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.काहीवेळा कर्तव्यावर असताना पोलिसांना कठोर व्हावे लागते. अनेकांना ठिकठिकाणी पोलीसांनी काठीचा ‘प्रसाद’ही दिला, परंतु अशा प्रसाद खाल्लेल्या तरुणांच्या सुद्धा आजचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे ऐकून डोळ्यांच्या कडा ओलावल्या! आपला बीड जिल्हा असाच संवेदनशील आहे; अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.आपला बीड जिल्हा सर्वांना एकमेकांवर प्रेम करायला शिकवणारा असून, कर्तव्यनिष्ठेचा सन्मान करणारा, आपल्यासाठी अहोरात्र झगडणाऱ्यांचा आदर करणारा, अत्यंत संवेदनशील आहे. आजपर्यंत सर्वांनी मिळून सर्व यंत्रणांना सहकार्य करून कोरोनापासून जिल्ह्याला वाचवले आहे, बीड जिल्हा अद्याप कोरोनामुक्त आहे. त्याला कोरोनामुक्तच ठेवावे आणि कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन ना. मुंडेंनी या पोस्टद्वारे जिल्हावासीयांना केले आहे.

टिप्पण्या