मुख्य सामग्रीवर वगळा

मोदींच्या आवाहनावर 'हसावे की रडावे' हेच कळत नाही: खा.इम्तियाज जलील 

औरंगाबाद: . एप्रिलमध्ये लोक एकमेकांना 'एप्रिल फूल' करतात, पोलीस आणि प्रशासनाने यावेळी अशाप्रकारे कुणी कुणाला 'एप्रिल फुल' करणार नाही याची काळजी घेतली होती. परंतु मोदी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून देशवासीयांना एप्रिल फूल केले असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी पंतप्रधानांच्या दिवे, बॅटरी, मोबाईलचा टॉर्च लावण्याच्या आवाहनावर टीका केली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ संदेश जारी झाला. मोदी पुन्हा देशाला उद्देशून काय सांगणार याची उत्सुकता माझ्यासह सर्व जनतेला लागली होती. कोरोनाचे संकट वाढलेले असताना देशातील आरोग्य सुविधांची परिस्थिती, लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची होत असलेली गैरसोय यावर सरकार काय उपाययोजना करणार? किंवा केल्या हे मोदीजी सांगतील असे अपेक्षित होते. परंतु देश एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा इव्हेंट घेत त्यात देशवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी उभारला जात आहे. देशातील मोठे उद्योजक रतन टाटा यांच्यासह सलमान खान, शाहरुख खान यांच्यासारख्या सिनेअभिनेत्यांकडून निधी दिला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार देशातील जनतेचे कोरोनाच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या आरोग्य सुविधा निर्माण करत असेल, ज्या गोरगरिबांचे लॉकडाऊनच्या काळात अन्नपाण्याशिवाय हाल होत आहेत त्यांच्यासाठी खास उपाययोजना करत असेल असे वाटले होते. पण देशाच्या पंतप्रधानांनी याआधी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला लावल्या, आता ते घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्त्या टॉर्च आणि दिवे लावण्यास सांगताहेत. त्यांच्या या आवाहनावर 'हसावे की रडावे' हेच कळत नाही. जगभरातील देश कोरोनाच्या संकटाशी कसा मुकाबला करत आहेत आणि दुसरीकडे आपण मात्र टाळ्या थाळ्या दिवे टॉर्च मेणबत्त्या यातच अडकून पडलो आहोत. आपण देशाला कुठे घेऊन जात आहोत याचा विचार पंतप्रधान मोदी व त्यांच्या अंध भक्तांनी करण्याची वेळ आली आहे.

टिप्पण्या