जनता विरोध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे. भाजपा नेत्यांनी शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पक्षाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी आपल्या एखाद्या वक्तव्याचा लोकांकडून विरोध होत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका असा टोला लगावला आहे.जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, “करोनासारखं गंभीर संकट असतानाही भाजपा नेते राजकारण करत होते. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. लोक आपल्या वक्तव्याचा निषेध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका”. जयंत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोंसोबत छेडछाड करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही तक्रार करण्यासाठी गेलो असता त्याची दखलही घेतली गेली नव्हती असं सांगितलं.“निवडणुकीत काही फेसबुक पेजच्या माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली जात होती. यासाठी त्यांना पैसे कोण पुरवत होतं,” असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी पक्ष ट्रोल करणाऱ्यांचं समर्थन करत नाही. भाजपा नेत्यांनी दिलेल्या तक्रारी योग्य असतील तर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे. पण सोबतच आपल्या काळात काय चालायचं याचाही विचार करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
टिप्पण्या