मुंबई | राज्यातील साखर उद्योगांना वाचविण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रानंतर माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटरवर मोठे शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश राणेंकडून अत्यंत टोकाच्या भाषेत होत असलेली टीका लक्षात घेता या वादाला आता वेगळंच वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता रोहित पवारांना ‘हा’ नाद सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. “एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नाही. काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यायचा”, असा सल्ला जयंत पाटील यांनी रोहित पवारांना दिला आहे.
“आपण आपली पातळी किती खाली न्यायची ? हे आपल्यावर आहे. एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नाही. आपण काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यावा. आपणच कुणाच्या किती तोंडाला लागायचं याची एक मर्यादा ठरवायची असते. त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. रोहित पवार अशांकडे दुर्लक्ष करतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. काही लोक उगाच घरात बसून काहीतरी वलग्ना करत राहतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्षच करावे, असा सल्ला जयंत पाटील यांनी रोहित पवारांना दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर हे वाकयुद्ध सुरु असल्याचे अखेर जयंत पाटील यांनी याला पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमके प्रकरण काय ?
साखर उद्योगाला वाचवण्याची मागणी करणारे पत्र जेव्हा शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिले तेव्हा निलेश राणेंनी टीकेचे शस्त्र उगारले होते. “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??”, असे ट्विट निलेश राणेंनी केले होते. त्यानंतर रोहित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आणि हे शाब्दिक युद्ध सुरु झाले.
राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी देखील निलेश राणे आणि रोहित पवारांच्या या वादात उडी घेतल्याने निलेश राणेंनी प्राजक्त तनपुरे यांच्यावरही अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणेंनी तनपुरे यांच्यावर टीका केल्याचे रोहित पवार यांनी तनपुरे यांना समजवताना केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात कि, “आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.”
टिप्पण्या