मुख्य सामग्रीवर वगळा

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला

बुधवारपासून बेपत्ता असलेल्या मांजरम येथील एका सहा वर्षीय बालिकेचा गावालगतच्याच विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेप्रकरणी पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरून एका संशयित युवकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी दिली आहे.

मांजरम येथे वास्तव्यास असलेले उत्तम वंजारे हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांची सहा वर्षाची मुलगी ऋतिका (६) ही २० जून रोजी सायंकाळी सहा वाजता घरासमोरून अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ उलटून देखील ऋतिका घरी आली नसल्याने वंजारे कुटूंबाने सगळीकडे शोधाशोध केली, परंतु तिचा काहीच पत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी ऋतिकाचा परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला. वंजारे यांच्या घरासमोरच राहणारा एक युवक बुधवारी सायंकाळी ऋतिकाला घेऊन जाताना बघितल्याची माहिती शेतीकाम आटोपून गावात परतलेल्या काही महिलांनी दिली.

दरम्यान तो युवक गावातून फरार झाल्याने वंजारे कुटुंबाचा संशय बळावला. अखेर पीडित परिवाराने नायगांव पोलीस स्टेशनला आपली मुलगी बेपत्ता असल्याची व संशयित आरोपी बद्दलची माहिती नोंदवली. त्यावरून गुरुवारी त्या संशयित आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. दरम्यान शोधकार्य शुक्रवारी देखील सुरुच असताना गडगा रोडवरील एका शेतातील विहिरीत बालिकेचा मृतदेह तरंगत असल्याची खबर मिळाली. पीडित कुटुंबासह नायगांव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह ऋतिकाचाच असल्याचे आढळून आले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगांव रुग्णालयात नेण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी तात्काळ नायगांव येथे धाव घेऊन घटनेचा आढावा घेतला. शवविच्छेदन होईपर्यंत पोलीस उपअधीक्षक खांबे हे ग्रामीण रुग्णालयात हजर होते. सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ सोनकांबळे हे देखील रुग्णालयात उपस्थित होते. दरम्यान मयत बालिकेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी पूर्ण झाली असून शवविच्छेदन अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राखीव ठेवल्याची माहिती विशाल खांबे यांनी दिली. तसेच पीडित वंजारे कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीवरून त्या संशयित आरोपी विरुद्ध कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे देखील खांबे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या